पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पदार्थविज्ञान शाखेचा एक नियम असा आहे की कोणतीही वस्तू मुळातून नष्ट होत नाही, तिचे फक्त रूप बदलते. उष्णतेची आच लावली तर बर्फाचे पाणी बनते, पाण्याची वाफ बनते, वाफेलाही अधिक उष्णता दाब देता आला तर आणखी काही वेगळे रूपांतर होऊ शकेल. अवयवांना जाणवणारे रूप म्हणजे शरीर बदलले तरी अणुपरमाणू तेच राहिले. त्यांचा विस्फोट झाला तर प्रचंड संहारक शक्ती किंवा ऊर्जा प्रकट होते. अशा विस्फोटाची शक्यता बाजूला ठेवली तर अवकाश व्यापणारी वस्तू अमर असते. 'अविनाशी ते आहे, ज्याने हे सर्व व्यापले आहे' ही उपनिषदांतील आणि वेदांतील अनंत तत्त्वाची व्याख्या आहे. हे शुद्ध विज्ञान आहे. शरीराच्या कपाटात कोंडून ठेवलेल्या प्राणरूपी पक्ष्याच्या आचरट अध्यात्माला येथे काहीच वाव नाही.
स्वातंत्र्य - कष्टप्रद यात्रा

 आत्मा म्हणजे मीपण. मी एका बाजूला आणि दुसरे एका बाजूला सारे विश्व अशी धारणा. असा आत्मा अणुरेणूंपासून सूर्यमालिकांच्या समुच्चयांपर्यंत सर्व वस्तूंच्या बांधणीत असतो आणि शरीर असणे हा मीपणाच्या जाणिवेचा गुणधर्म आहे. शरीराच्या विकासाबरोबर बुद्धीचा विकास होतो, वेगवेगळ्या पातळीवरील मनांचा विकास होतो आणि या सर्वांवर मी विरुद्ध विश्व या आत्मभावनेची देखरेख असते. सम्यक् सत्याचा साक्षात्कार मायेची बंधने दूर केली म्हणजे आपोआपच होतो या कल्पनेतील बाष्कळता आता स्पष्ट होईल. सम्यक् सत्य या क्षेत्राचा अधिकारी कोणी असेल किंवा नसेल हा वादाचा मुद्दा थोडा बाजूला ठेवावा. पण असा विश्वरूप पुरुष सोडल्यास आपण सर्व सीमीत क्षेत्रांचेच अधिकारी आहोत; आपल्याला इंद्रिये पाचसहाच, त्या इंद्रियांची झेप मर्यादित आणि त्यांचा मुख्य हेतू संरक्षण, पोषण, आणि प्रजनन; विश्वाचे अवगाहन हा नाही. देहाच्या धिक्काराने ज्ञान वाढत नाही. देहाचे सामर्थ्य आणि आवाका वाढवल्याने कदाचित् काही कणमात्र फरक पडण्याच्या संभावनेचा एक किरकोळ आशाकिरण असू शकतो. कणाकणाने, क्षणाक्षणाने ज्ञानकण जमवावेत, तर्काच्या कसोटीवर घासून पुसून त्यांचा काही अर्थ लावावा; काही अर्थ लागला तर आनंद मानावा. नवीन अनुभवातून जुन्या अर्थाचे अपुरेपण जाणवले म्हणजे पोटच्या पोराला उखळात घालून कांडण्यासारख्या वेदना सहन करून नव्याने काही अर्थ

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२०७