आध्यात्मिकांनी म्हणायला सुरूवात केली. स्वातंत्र्य आंदोलनातील बॉम्ब
खटल्यातील आरोपी अरविंद घोष मोक्षाचे खरे अधिकारी ठरतात; आणि
गांधींसारखा महात्मा देशाच्या स्वातंत्र्यासाठी मिठाची चिमूट उचलण्याचा
'अव्यापारेषु व्यापार' करायला सरसावतो; शेवटी उद्दिष्ट तेच; धार्मिकांनी,
अध्यात्मिकांनी मांडलेले; शरीराच्या तुरुंगातून आत्म्याला मुक्त करण्याचे. पण
मोक्ष साधनेच्या मार्गातील प्राथमिक अडचणी म्हणजे राजकीय, सामाजिक,
आर्थिक, अन्याय, जुलूम, गुलामगिरी, स्वातंत्र्याच्या आकांक्षेचा मूलाधार
आध्यात्मिक मोक्ष आहे अशी सार्वत्रिक समजूत आहे. स्वतंत्र पक्षाचे
संस्थापक चक्रवर्ती राजगोपालाचारी; त्यांचे निकटचे कन्हैयालाल मुन्शींसारखे
सहकारी ही सर्व माणसे धार्मिक प्रवृत्तीची. याचा एक दुष्परिणाम असा झाला
की स्वतंत्रतावादी तेवढे सारे पुराणमतवादी, उजव्या विचारांचे अशी एक पक्की
समजूत होऊन बसली.
ऐहिक बेड्या तोडून मोक्ष साधना करणाऱ्या मुमुक्षूनी सांसारिक
गुलामगिरी तोडण्याचे प्रयत्न पूर्वअट म्हणून करावे आणि त्यांचे त्यांचे
स्वतंत्रतेचे वेगळे तत्त्वज्ञान उभे करावे यात काही आपत्ती नाही; पण स्वतंत्रतेचे
सर्व चाहते मोक्षमार्गीच असले पाहिजेत, किंबहुना मुमुक्षूखेरीज स्वातंत्र्याची
तहान दुसऱ्या कुणाला खऱ्या अर्थाने असू शकतच नाही; असे म्हणणे
अतिरेकी होते. सर्वच स्वतंत्रतावादी 'मुमुक्षू' ही उपाधी सन्माननीय पदवी
म्हणून स्वीकारणार नाहीत, काहींना तर ती अभद्र शिवीही वाटण्याची शक्यता
आहे.
आचरट अध्यात्म
आत्मा म्हणजे काही चैतन्यमयी ज्योत आहे, ती शरीराच्या कपाटात कोंडलेली असते आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत ती जशीच्या तशी राहते, तीत काहीच बदल होत नाहीत, काय बदल होतील ते शरीरात होतात आणि शरीर मृत्यू पावले की हे चैतन्य उडून पुन्हा दुसऱ्या देहाच्या पिंजऱ्यात जाऊन बसते हा आचरट अध्यात्म आहे. पूर्वासूरीच्या महामुनींनी प्रतिपादन केलेल्या सूत्रांचा हा भ्रष्ट आविष्कार आहे. कर्मकांडावर आपली दिनचर्या चालावी अशा सोयीने पोटभरू धर्मव्यावसायिकांनी हेतुपूर्वक घडवून आणलेला हा गोंधळ आहे. शुद्धस्वरूपी अध्यात्माचा अर्थ असा नाहीच.