पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परवडणारे नाही हे संसारी जनांना स्पष्टच होते. म्हणून त्यांनी नागड्याउघड्या, घाणीत लोळणाऱ्या, वेड्यासारखे बडबडणाऱ्या अवलियांचे कौतुक केले, पण भक्तीची तहान भागविण्याचे एक साधन या पलीकडे व्यवहाराच्या कामी त्यांचा फारसा उपयोग नाही, किंबहुना त्यांची सगळी आराध्य दैवतेही अगदीच निकामी याची त्यांना पूर्ण जाणीवही होती. देव प्रसन्न झाला तर कमाल कमाल म्हणजे तो कबीराचे शेले विणतो, कुणाची धुणी धुवून देतो, भांडी घासून देतो, दळण दळून देतो; भूतदयेपोटी सरकारी गोदामे लुटू देणाऱ्या दामाजीसाठी बादशहापुढे जोहार घालतो. पण या असल्या चमत्कारांनी रोजची भूक भागत नाही हे संसारी जनांनी बरोबर ओळखले. त्यामुळे, अवलियांना साष्टांग दंडवत घालावे आणि एरवी सगळा वेळ संसाराच्या विवंचना निपटण्यात काढावा, तो क्रम चालत राहिला.
स्वातंत्र्य-मोक्ष गल्लत
 स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्यांनी मग आपल्या भूमिकेत थोडा कावेबाजपणा केला. 'जोडोनिया धन, उत्तम व्यवहारे' असे तुकासुद्धा म्हणाला. 'प्रपंच करावा नेटका' आणि पहिले धर्मकारण असले तरी दुसरे तरी राजकारण असावे हे रामदासांनी स्पष्ट केले. साऱ्या जगभरच्या विचारात एक मोठा बदल घडून आला. सुलतानशाहीच्या अरेरावीत माणसाने मनाचे स्वातंत्र्य प्राणपणाने जपून ठेवावे किती आणि कसे? फाटकी वस्त्रे नेसलेल्या आपल्या पत्नीच्या पदराशी लटकून पोरे भूकभूक करीत आहेत हे चित्र डोळ्यासमोर आले की 'मनस्वी पूंमान्'सुद्धा तोंडातून शब्द फुटत नसता 'देहि देहि' म्हणून भिक्षा मागायला तयार होतात. समाजातील रूढीच्या बंधनाने, आपल्या पोटच्या कोवळ्या वयातील मुलीचे कपाळ पांढरे झाल्यावर तिचे केस कापून तिला विद्रूप करून खाऊ मागण्याच्या वयातच उपासतापास करावयास लावणे भाग पडते हे टाळता येत नाही.

 राजकीय, सामाजिक, आर्थिक बेड्या तोडून जंगलात जाणे आणि हिमालयात जाणे ही क्वचित् एखाद्याची खरीखुरी मोक्षसाधना असेल; पण त्यात पळपुट्या भेकडांची सोय अधिक आहे हे स्पष्ट होऊ लागले तसतसे राजकीय, आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य या आध्यात्मिक स्वातंत्र्याच्या आणि मोक्षाच्या पायऱ्या आहेत, मुमुक्षूनी या पायऱ्या ओलांडल्या पाहिजेत असे

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
२०५