करावे, प्रियजनांचे आराधन करावे, त्यांची मने जिंकण्यासाठी निसर्गदत्त
आणि स्वकष्टार्जित सारे वैभव त्यांच्या पायांशी घालावे; मुबलकता असावी,
विपुलता असावी अशी सर्वसामान्य जनांची साहजिक इच्छा असते. पण
संरक्षण, पोषण आणि प्रजोत्पादन यांकरिता जगणारी माणसे म्हणजे निव्वळ
शेणातले किडे; मोहपाशात आकंठ बुडालेले; यांना स्वातंत्र्याची चव कोठून
कळावी? सर्व संसाराचा त्याग करून भगवी छाटी गुंडाळून हिमालयात किंवा
दुसऱ्या कोणत्यातरी रम्य जागी – जिथे कंदमुळे, फळे इत्यादींवर कष्ट न करता
गुजारा होईल अशा जागी रहावे म्हणजे स्वातंत्र्याचे निर्वाणमोक्ष मिळते,
ब्रह्मप्राप्ती होते, विश्वाचे गूढ उलगडते असे चैतन्यवाद्यांनी मांडले.
राजकीय, सामाजिक, आर्थिक वास्तव कसे का असेना, सन्यस्त
वैराग्याला त्याचे काय देणे घेणे? खऱ्याखुऱ्या व्यक्तिगत स्वातंत्र्यमोक्षासाठी
काही ऐहिक पाया आवश्यक आहे असे या अवधूतांना मान्यच नाही.
नेवाशाच्या शेजारील देवगिरीच्या रामदेवरायाने काकाचा वध करून सत्ता
मिळविली आणि दूरच्या दिल्लीश्वर अल्लाउद्दिनाने देवगिरीची वाताहत केली
त्याचा 'योगियांच्या राजा'वर काहीसुद्धा परिणाम झाला नाही. पुणतांब्यांच्या
चांगदेव महाराजांचे गर्वहरण करण्याइतके सुद्धा महत्त्व अल्लाउद्दिनाच्या स्वारीला
त्यांनी दिले नाही. 'नेवाशापरतें आळंदी बरें' एवढा व्यावहारिक निर्णय मात्र
त्यांनी घेतला!
बहामनी राज्याच्या पुंडांनी वारंवार सारी गावे लुटून नेली, त्यात
विक्राळ दुष्काळ पडला, तुकारामाची पहिली बायको अन्नान्न करीत मेली,
पण मोक्षमार्गाच्या यात्रिकाची प्रतिक्रिया 'बाईल मेली, बरे झाले', विठोबाचे
नाव घेण्यास आपण मोकळे झालो अशी होती.
अशा तऱ्हेने योगसिद्धी प्राप्त झालेल्यांनी, त्यांना काय सर्वज्ञान झाले
आणि ब्रह्म आकळीले ते आम्हा संसारी जनांसाठी सांगून ठेवले नाही.
आपणच मिळविलेले ज्ञान, आपणच त्याची द्वाही फिरवायची, आपणच पेटंट
घ्यायचे आणि एक दिवस निघून जायचे असा हा स्वतंत्रतेचा अवधूती
आविष्कार!
सांसारिकांचा व्यवहारवाद
असले अवधूती स्वातंत्र्य आपल्याला झेपणारे नाही, पचणारे नाही,