मानतो. यात 'बळी तो कान पिळी' नाही; यात 'बळीराज्य' आहे.
सरकारी हस्तक्षेप नसावा खुली बाजारपेठ असावी, त्यातूनच सीमित
साधनांचा असीम इच्छा आकांक्षांच्या पूर्तीसाठी कार्यक्षम प्रयोग होईल, हे
'स्वतंत्रतावादा'चे फक्तः एक अंग आहे. अर्थकारण म्हणजे सगळे जीवन नाही.
आयुष्यात भाकरीचे महत्त्व आहे, पण भाकरी म्हणजे आयुष्य नाही. माणसाच्या
व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. आसपासचे जग न्याहाळावे; निसर्गाचा खेळ
समजून घ्यावा अशी ज्ञानसंपादनाची त्याला ओढ आहे. आपल्यातील कमनशिबी
गरीबगुरीबांना, अपंगांना साहाय्य करावे अशी करुणाबुद्धीही माणसात उपजूशकते.
आपल्या मनातील विचार वाचेने, शब्दाने, कुंचल्याने, सरगमच्या साहाय्याने व्यक्त
करावे यात त्याला परमानंद होतो. तलवारीने केवळ भाकरीचीच अर्थव्यवस्था
नासवली असे नाही तर ज्ञान, करुणा, अभिव्यक्ती अशा सगळ्या क्षेत्रांचा खराबा
करून टाकला. 'स्वतंत्रतावाद' म्हणजे केवळ स्पर्धेवर आधारित बाजारपेठेची
व्यवस्था नाही. बाजारपेठ हे स्वतंत्रतावादाचे फक्त एक अंग आहे. येथे कोणाचेच
राज्य नाही, येथे राज्य फक्त ग्राहकांचे, म्हणजे खरीखुरी लोकशाही. या भाकरीच्या
क्षेत्रात, त्याखेरीजच्या प्रत्येक क्षेत्रात काही वेगळीवेगळी व्यवस्था स्वतंत्रतावाद
मानतो. कायदा व सुव्यवस्था राखणारे समर्थ शासन असावे; दीनदुबळ्यांना,
अपंगांना हात देणाऱ्या करुणेवर आधारलेल्या संस्था असाव्यात, कलावंतांची
आपापली सरकारे असावीत, विद्वानांच्या सार्वभौम वेगळ्या पंडीतसभा
असाव्यात. 'स्वतंत्रतावाद' हा विविधतेला मानणारा आहे.
प्रवाह अडणारा नाही
स्वतंत्रतावाद म्हणजे 'लेसे फेअर', थोडक्यात, 'मन:पूतम् समाचरेत्' अशी हेटाळणी करणाऱ्यांच्या मनात एक ठाम कल्पना रुजलेली असते. 'आपोआप कोणतीच गोष्ट सुरळीतपणे होत नाही. कोणी कर्ता असेल तर काहीतरी ठीक होण्याची शक्यता आहे, एरव्ही नाही. सगळे जग सुरळीतपणे चालले आहे, कारण वर आकाशात देव आहे' असे मानणाऱ्यांचीच ही शाळा. तप्त, लालबुंद झालेला ज्वालामुखी ओतणाऱ्या पृथ्वीच्या गोळ्यातून केवळ निसर्गक्रमाने मनुष्यप्राणी आपली संस्कृती उभी करू शकतो हा चमत्कार डोळ्यासमोर असतानाही निर्मिकाची परमेश्वरी कल्पना का मांडली जाते? प्रत्यक्ष कोणी निर्मिक असला तरी तो काही आपला दावा मांडायला