स्वतंत्रतावादाचे अर्थशास्त्र - बळीराज्य
अशी जोडणी जीवशास्त्राच्या क्षेत्रात निसर्गाने केली. अर्थशास्त्रात ते
शक्य आहे काय? जी काही थोडीफार साधने असतील ती आपल्या हाती
यावी किंवा आपल्या जवळच्यांच्या हाती यावी यासाठी जो तो खटाटोप
करतो. काही खुळे कष्ट करून पीक काढतात, काही दुसरे घाम गाळून
जगण्याची इतर साधने तयार करतात. खास हुशार आणि चलाख माणसे
आपला घाम गाळण्याऐवजी दुसऱ्यांचे रक्त सांडणे पसंत करतात; दुसऱ्यांनी
पिकवावे आणि तलवारीच्या, बंदुकीच्या जोरावर ते हस्तगत करावे हा त्यांचा
कायमचा खाक्या. 'बळी तो कान पिळी' असे आजपर्यंत चालले. बळीचे रूप
बदलले. बळीराजाला जमिनीत गाडून बलशाली पुढे सरसावले. धर्माच्या
आधाराने काहींनी तलवार चालवली. काहींनी राजेशाहीच्या नावाने, काहींनी
साम्राज्याच्या नावाने, काहींनी राष्ट-वादाच्या नावाने. अर्थव्यवस्थेत प्रत्येक
माणसाला किंवा समाजाला त्याच्या गरजा भागवण्यापोटी काय आणि किती
मिळावे याचा निर्णय आजपर्यंत तलवारीच्या धारेवर झाला. दुष्ट मातले आणि
कष्ट करणारे झिजत मेले. कष्टकऱ्यांचा झेंडा उभारणाऱ्या समाजवाद्यांनी
साधनांच्या वाटपाकरता पूर्वापारप्रमाणेच तलवारच वापरली; थोडी वेगळ्या
शैलीने आणि धाटणीने, एवढाच काय तो फरक!
चमत्कार असा की, या तलवारधारी क्रूरकर्त्यांचा डायनासॉरप्रमाणेच समूळ उच्छेद होण्याची वेळ आली आहे. ताकदवान असेल पण ते सुयोग्य साधन नाही. तलवारीने जगणारे समृद्ध झाले तर घाम गाळणाऱ्यांना काय उमेद राहील, त्यांनी धीर सोडला तर साधनांची विविधता जोपासली कशी जावी आणि साधनांचा उपयोग व्हावा कसा? आणि हे जमले नाही म्हणजे अर्थव्यवस्थेचा सारा डोलाराच कोसळून पडेल. अर्थशास्त्रातील तलवारीचे स्थान आता संपत आले आहे. तलवारीच्या आधाराने उभ्या राहिलेल्या धर्मसंस्था, राज्यसंस्था आता भुईसपाट होऊ लागल्या आहेत. विविधता तयार करणारा उत्पादक आणि त्याचा उपभोग घेणारा ग्राहक ही एकाच व्यक्तीची दोन अंगे आहेत. माणसाने उत्पादन करावे, ते जगासमोर ठेवावे, जगाच्या नजरेत त्याच्या या नजराण्याचे जे काही मोल असेल त्याप्रमाणे उत्पादकाला मोबदला मिळावा, यात कोणाचाच हस्तक्षेप असू नये अशी अर्थव्यवस्था 'स्वतंत्रतावाद'