पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शौर्य, गरुडाची आकाशात झेप घेण्याची ताकद या सगळ्यांना बाजूला सारून, यातील प्रत्येक गुणात त्या त्या प्राण्यापेक्षा कितीतरी कमी असलेल्या माणसाने विजय मिळविला. विजय ताकदीचा झाला नाही. माणूस टिकून राहिला याचे कारण वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे सामर्थ्य त्याला लाभले. आपल्या बुद्धीचा उपयोग करून, पोटापाण्याच्या गरजा भागवून; साधने आणि संघटना तयार करण्याच्या त्याच्या कसबामुळे माणूस श्रेष्ठ ठरला. निसर्गात माणसाने विजय मिळवला याचे कारण निसर्गापासूनच त्याने धडा उचलला; विविधता जोपासावी आणि त्यातून 'सुयोग्या'ची निवड करावी हा निसर्गनियम माणसाने उचलला म्हणून तो टिकला आहे. आपले निवडीचे स्वातंत्र्य सतत विस्तारत ठेवण्याच्या ध्यासाने/आकांक्षेने मनुष्य श्रेष्ठ ठरला!
 डार्विनवादात 'बलिष्ठ ते टिकतात' अशी कल्पनाच नाही. स्वतंत्रता जोपासणारे टिकतात आणि बंधनापुढे मान तुकवणारे संपतात, एवढाच डार्विनवादाचा मतितार्थ आहे. स्वतंत्रतावादाला डार्विनवाद म्हणताना उपहासाचा सूर लावणाऱ्यांना डार्विन समजला नाही, स्वतंत्रतावादही समजला नाही आणि माणूस तर त्याहून समजला नाही.

 अर्थव्यवस्था म्हणजे तरी निसर्गाचाच एक टप्पा. निसर्गात जो नियम लागू तोच येथेही लागू. पृथ्वीवर माणसाला लागणारे हवा, पाणी, जमीन, अन्न, निवारा यांत हिस्सा मागू इच्छिणारे सर्व प्राणिजात उत्क्रांतीच्या प्रवाहात संपून गेले तरी टिकून राहिलेल्या माणूस जातीतील सर्वांच्या गरजा, तहान, भुका आणि इच्छा पुऱ्या करण्याससुद्धा धरती असमर्थ आहे. प्रत्येक माणसाच्या इच्छा अनेक. त्यांचे समाधान होते ना होते तोच नव्या गरजा आणि इच्छा तयार होतात. अनंत अपार इच्छा, आकांक्षा, लालसा आणि त्या भागविण्यासाठी लागणारी पृथ्वी मात्र सीमित आणि मर्यादित. इच्छा अनेक, साधने थोडी! तेव्हा वेगवेगळ्या इच्छाआकांक्षात प्राधान्य कोणाला द्यायचे, कोणती गरज पहिल्यांदा भागवायची, कोणती नंतर याचा निर्णय केला पाहिजे. काही गरजा, इच्छा दाबून टाकल्या पाहिजेत; बाकीच्यांचे होईल तितके समाधान केले पाहिजे. त्यासाठी, उत्पादित केलेली साधने जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापरली पाहिजेत. असीम इच्छा आणि सीमित साधने यांची कार्यक्षम जोडणी हाच तर अर्थशास्त्राचा विषय आहे.

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१९९