पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एवढेच माणसाला शक्य आहे. थोडक्यात, निसर्गाच्या निवडीपेक्षा अधिक कार्यक्षम निवड या मर्त्यलोकात तरी असंभव आहे.
 काही प्राण्यांत आईच आपल्या पिलांना खाते. पिलांची संख्या जास्त झाली, त्यांना सगळ्यांना पाजता येणार नाही, आईची ताकदच कमी पडू लागली की आपल्याच पिलावळीतील काहींचा चट्टामट्टा करणाऱ्या प्राण्यांच्या जाती अनेक आहेत. निसर्गमाता असेच काहीसे करते. जन्माला आलेले सर्व प्राणिजात आणि त्यांच्या जाति टिकून राहिल्या पाहिजेत असा पर्यावरणवादी प्रयत्न निसर्ग करताना कधी दिसत नाही. दररोज असंख्य जाती तयार कराव्या आणि दररोज असंख्य जाती नष्ट कराव्या हा निसर्गाचा खेळच आहे; त्यात दुष्टता काहीच नाही.
 असमर्थांना संपवायचे नाही म्हटले तर पर्याय एकच उरतो; तो म्हणजे समर्थांना संपविणे. समर्थांना संपविण्यास समर्थ असलेली तरसत्ता असली तर काही काळ, कदाचित, समर्थांना चेपून असमर्थांना तगवता येईल, पण हा असला 'अव्यापारेषु व्यापार' फार काळ चालणार नाही.
 गोसंवर्धन केवळ गोहत्याबंदी केल्यामुळे होत नाही. किंबहुना, सगळ्यात चांगले गोसंवर्धन करण्यासाठी गोवंशाचे कुटुंबनियोजन आणि हत्या आवश्यक आहे; हे अनुभव सांगतो. जेवढी मुले जन्माला येतील तेवढ्यांना जगू द्यायचे म्हटले तर तो भार असह्य होईल. तेव्हा, कुटुंबनियोजनाची गरज आहे हे आता सर्वसामान्यांनाही उमजू लागले आहे. आपण कुटुंबनियोजन केले नाही तर लढाया, दुष्काळ, रोगराई आणि साथी अशी हत्यारे वापरून निसर्ग आपोआप कुटुंबनियोजन करून टाकतो. डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतात ‘सुयोग्य' टिकून राहतात. हा सिद्धांत निसर्गाच्या कुटुंब नियोजनाचा नियम आहे. त्यात दुष्टता कसली?
निसर्गाचे अनुकरण

 डार्विनवादाचा विचार करताना आणखी एक गैरसमज दूर केला पाहिजे. 'सुयोग्य ते' टिकतील याचा अर्थ 'दांडगे' टिकतील, दुष्टांचा विजय होईल, बलिष्ठ तेवढे जगतील असा मुळीच नाही. माणसापेक्षा; एवढेच काय; हत्ती, गेंडे, देवमासे यांच्यापेक्षाही अवाढव्य आकाराचे आणि ताकदीचे प्राणी पृथ्वीतलावरून नष्ट झाले. हरणाचे चापल्य, चित्त्याची लवचिकता, वाघाचे

१९८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने