पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थोडक्यात, ते तगून राहू शकतात. ज्यांना हे जमत नाही ते ना स्वत:चा बचाव करू शकतात, ना पोट भरू शकतात. मग अशांची प्रजा निपजणार कशी आणि निपजली तरी टिकणार कशी? जे परिस्थितीवर मात करतात ते टिकतात, जे टिकू शकत नाहीत ते संपतात. जगण्यासाठीचा हा संघर्ष म्हणजेच निसर्ग. यात काही क्रौर्य नाही; अ आणि ब दोघेही टिकणे शक्य नाही; दोघांपैकी एकाला संपले पाहिजे. कोणी संपायचे हे निसर्ग ठरवतो. यात क्रूरता काहीच नाही. कोणी काहीही, कितीही म्हटले तरी सर्वच विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी देऊन किंवा प्रथम क्रमांक देऊन पास करणारी शिक्षणव्यवस्था असूच शकत नाही. काही एका फूटपट्टीने मोजमाप करून श्रेण्या लावण्याखेरीज गत्यंतरच नाही. पहिला आलेला विद्यार्थी सर्वात बुद्धिमान, सर्वात कष्टाळू, सर्वश्रेष्ठ असतोच असे नाही. एका काळी, एका जागी, एका फूटपट्टीने तो इतरांपेक्षा वरचढ ठरतो, एवढेच काय ते! उच्च शिक्षणासाठी प्रवेश किंवा नोकरीत प्रवेश यांच्या शक्यता मर्यादितच असणार. म्हणजे, त्यासाठी निवड करावीच लागणार आणि निवड करायची म्हटली की नाही तरी फूटपट्टी हवीच.
निसर्गाची निवड
 माणसांच्या समाजात ही निवड आपापल्या सोयीची व्हावी यासाठी सगळेचजण धडपड करतात. भटशाहीत, वरच्या समाजात जन्मला या जन्मसूचीचा फायदा घेतला जाई; सगळ्या शिक्षणाचे स्वरूप 'ब्राह्मणी' करून इतर जातीयांना मागे टाकले जाई. बहुजन समाजाचे राज्य आल्यावर त्या समाजातील लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे काढण्यासाठी 'बहुजनसमाजी साधने' वापरात आली. सामाजिक न्यायाच्या घोषात जन्मसूचीऐवजी जन्मदलिताला प्राधान्य देण्याची टूम निघाली.

 माणसाने केलेली निवड म्हटली की त्यात अशी ढवळाढवळ असतेच. पृथ्वीवरचा न्याय आणि देवाच्या दरबारातील चित्रगुप्ताचा हिशोब यात फरक राहणारच. चित्रगुप्ताचा असा काही सर्वसाकल्याने विचार करणारा हिशोब आणि अहवाल ही एक कल्पना आहे. कोणाही माणसाची अशी सर्वांगीण चाचणी होऊच शकत नाही. सर्वतोपरी परिपूर्ण अशी चाचणी माणसाला करणे अशक्य आहे. जास्तीत जास्त काय होईल? निवडीत कोणाचाही हस्तक्षेप कमीत कमी रहावा, म्हणजे जाणूनबुजून केलेली ढवळाढवळ किमान राखावी

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१९७