ते आम्ही राष्ट-नेते ठरविणार. त्याला रुपयापैशांच्या फूटपट्ट्या कसल्या
लावता? समाजवादी समूहवादावर काही आर्थिक जबाबदाऱ्या होत्या.
'हिंदुत्वा'त समूहवाद म्हणजे निव्वळ सत्ता. त्यावर कोणते बंधन नाही;
अगदी, आर्थिक अंकुशही रहात नाही. अडवानी हे या अर्थाने पंडित नेहरूचे
खरे वारसदार आहेत.
अलीकडच्या काळात समाजवादी समूहवादाला आव्हान देणारे
भारतात कोणी निघालेच नाही असे नाही. लायसेन्स-परमिट-कंट-ोल
राज्याविरुद्ध चक्रवर्ती राजगोपालाचारींनी बंड उभारले. नियोजनाविरुद्ध ब्रह्मानंद
वकील आणि बी. आर्. शेणॉय यांसारख्यांनी सज्जड आव्हान उभे केले.
शेवटी, बळीराज्याची संकल्पना मांडणारे शेतकरी आंदोलनही इथे उभे राहिले.
अ-राज्यवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी, व्यक्तिप्राधान्यवादी, स्वतंत्रतावादी
विचारांची ही अस्सल भारतीय परंपरा आहे. हे परदेशी वाण नाही. हे वाण
विलायती असल्याचा कांगावा करून त्याचा पाडाव करणे जमणार नाही.
खरी अडचण येते ती स्वतंत्रतावाद्यांतील आंग्लविद्याविभूषित शहरी
विद्वानांची. आपले पांडित्य दाखविण्याकरिता त्यांना हायेक आणि फॉन
मिझेस, पॉपर अशी नावे जिभेवर खेळवण्याचा नाद आहे. त्यामुळे,
स्वतंत्रतावाद काही परदेशी फंड आहे अशी समजूत पसरण्यास मदत होते.
(६ जुलै १९९६)