पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूजा करणारी आहे. तस्मात्, व्यक्तिस्वातंत्र्य हे परदेशी वाण आहे, ते भारतीय भूमीत रुजणे कठीण आहे असे आग्रहाने सांगितले जाते. “कुटुंबासाठी एका माणसाचा त्याग करावा, गावासाठी कुटुंबाचा, देशासाठी गावाचा, इत्यादी इत्यादी.” अशी भारतीय परंपरा आहे; समूह श्रेष्ठ, त्यातील सदस्य कनिष्ठ अशी येथली परंपरा आहे, असे आग्रहाने प्रतिपादन केले जाते.
 या युक्तिवादात काही फारसे तथ्य नाही. 'आत्मानं सततम् रक्षेत् प्राणैरपि धनैरपि ।' असाही इथला आदर्श आहे. समूह हा धर्म-अर्थ-कामाचे साधन होऊ शकतो पण मोक्षाची यात्रा ज्याची त्याची ज्याने त्यानेच करायची आहे, अशीही येथील परंपरा आहे. किंबहुना, पिंड आणि ब्रह्मांड यांची एकता हा 'लोकायत' आणि वेदान्त तत्त्वज्ञानाचा पाया आहे. मुसलमानी आक्रमणातून आणि इंग्रजी सत्तेतून देश सावरू लागल्यावर मुसलमानी आणि ख्रिस्ती आदर्श स्वीकारणारे काही समाजधुरीण पुढे झाले. स्वामी दयानंद, विवेकानंद त्यांतले अग्रणी. सावरकर-गोळवलकरांनी हिंदु समाजाला समूहाचे रूप देण्यात धन्यता मानली. असे केल्यानेच मुसलमानी, ख्रिस्ती आव्हानाला तोंड देता येईल, अशी त्यांची धारणा. मुस्लिम आणि ख्रिस्त्यांच्या अंधानुकरणाने हिंदु समाजाला संघटित रूप देण्याकरिता प्रमाणग्रंथ आणि राष्ट-वाद तयार करून अथांग हिंदुसागराचे चांगले बांधबंदिस्तीचे तळे बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आजचे “हिंदुत्व'वादी त्यांचेच करंटे वारसदार!
 नव्या येणाऱ्या युगात ख्रिस्ती, मुसलमानी तोंडवळ्याच्या सामूहिकतेचा आणि सामाजिक बांधणीचा पाडाव निश्चित आहे आणि व्यक्ती व विश्व यांच्या प्रेरणा एकच मानणाऱ्या वेदांताचा विजय होत आहे हेही या अभागी 'हिंदुत्ववादी हिंदुत्वद्रोह्यांच्या लक्षात येत नाही.
 'स्वतंत्रतावादा'ची गंगोत्री मनुष्यजातीच्या इतिहासात भारतीय तत्त्वज्ञानात सापडते, इतकी ही अस्सल भारतीय संकल्पना आहे. तिलाच आज परदेशी वाण समजले जावे ही केवढी दुर्भाग्याची गोष्ट!

 पुरातन भारतीय व्यवस्था ही 'अ-राज्यवादी' आहे. माणसाच्या वेगवेगळ्या प्रज्ञांचे वेगवेगळे शासन विभागण्यात आले आहे. शस्त्राच्या साहाय्याने क्षत्रिय राज्य करतील, भिक्षा एवढाच अधिकार असलेल्या तपस्वी

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१९३