पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छिद्रांपैकी एक आहे. ही सर्व छिद्रे सारखीच परिपूर्ण आहेत आणि सारखीच अपरिपूर्ण आहेत. एका छिद्राने दुसऱ्या छिद्रास 'काफर' म्हणण्याचे काहीच कारण नाही, ही स्वतंत्रतेची भूमिका आहे. आपल्या वाट्याला आलेले छिद्र क्षणाक्षणाने विस्तारले पाहिजे; तरच अनंताची थोडीअधिक जाणीव होईल, ही स्वतंत्रतेची निष्ठा आहे.
 ही स्वातंत्र्याची शोधयात्रा कधी संपणारी नाही. कोणा काल्पनिक, आदर्श समाजापाशी किंवा स्वर्गापाशी पोहोचून ही यात्रा थांबत नाही. स्वतंत्रतेच्या विचाराला सीमाच नाहीत. ज्याला अंत आहे त्या सांताला नाव देता येईल. ज्याला अंतच नाही त्या अनंताला नाव काय द्यावे? दार्शनिकांनी ब्रह्मतत्त्वाचे वर्णन करताना 'हे नाही, हे नाही' म्हणजे 'नेति नेति' एवढीच व्याख्या दिली. स्वतंत्रतेची व्याख्या अशीच 'नेति नेति' आहे. आजचे हे बंधन नको, ही बेडी नको. उद्याची नवी बंधनेही आम्ही झुगारू. कोणतेही मत, कोणताही महात्मा, कोणतेही पुस्तक त्रिकालाबाधित वंद्य आणि पूज्य असूच शकत नाही. जन्माच्या अपघाताने मिळालेला कोणताही गुणावगुण दंभ मिरवण्याच्या लायक नसतो. ही स्वातंत्र्याच्या उपासकाची प्रवृत्ती आहे. स्वातंत्र्याच्या कक्षा वाढवणे, संकुचितपणाचा वाढता संकोच करणे एवढीच स्वतंत्रतेची व्याख्या देता येईल.
 याच तत्त्वाने जगाची निर्मिती झाली आणि उत्क्रांती चालली आहे; मनुष्य आणि समाज यांचा विकास घडतो आहे. स्वतंत्रता ही सर्व विश्वाच्या चलनवलनाचे सूत्र असे आजतरी दिसते आहे. उद्याचे काय सांगावे? मुक्तीची आस धरणारांना 'मुमुक्षु' असा शब्द आहे. प्रत्येक माणसाला 'मुमुक्षु' समजणाऱ्या विचाराचे नाव काय?
स्वतंत्रता देशी की विदेशी?

 स्वतंत्रता म्हणजे काय आणि तिला नाव काय द्यावे याची चर्चा वर झाली. त्याची सारी भाषाच 'वेदान्ती' भासू लागते. ही मोठी विचित्रच गोष्ट म्हणायची. कारण, या वादाचे सारे मान्यवर पुरस्कर्ते पश्चिमी देशांतील आहे. ॲडम स्मिथपासून हायेक, फॉन मिझेस, पॉपर, फिल्डमनपर्यंत सगळी नावे तिकडचीच. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य ही संकल्पना पश्चिमी आहे. याउलट, भारतीय परंपरा आई, वडील, गुरु आणि राजा यांना मानणारी आहे, पूर्वजांची

१९२
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने