पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असहाय्य, व्याधिग्रस्त अशांच्या मदतीला शुद्ध करुणेपोटी जाणाऱ्यांना संरक्षणाच्या आणि अर्थार्जनाच्या कामी सुयोग्य असलेल्या व्यवस्था कशा चालतील?
 थोडक्यात, स्वातंत्र्याची व्यावहारिक व्याख्या काय? शासन मजबूत असावे, सामर्थ्यवान असावे. पण ही सगळी ताकद सरकारने करावयाच्या कामांसाठीच लागावी आणि सरकारचे काम कोणते, तर जे इतर कोणाही व्यक्तीला किंवा संस्थांना करणे जमत नाही ते. किमान आवश्यकच असेल ते शासनही जास्तीत जास्त विखुरलेले आणि प्रत्येक क्षेत्राच्या स्वरूपाप्रमाणे रंगरूप धारण करणारे असावे. सत्ता नाकारल्याने अराजक होईल. तेव्हा, सत्ता असावी पण किमान विखुरलेली असावी. म्हणजे माणूस स्वत:च्या व्यक्तिमत्वाचा परिपोष आणि अधिकाधिक स्वातंत्र्याचा घेऊ शकेल याला म्हणायचे स्वातंत्र्य.
 या अशा विचारसरणीस नाव कोणते द्यावे. इंग्रजी किंवा इतर पाश्चिमात्य भाषात याला 'Liberalism' असा शब्द वापरला जातो. त्याचा मराठी अनुवाद 'उदारमतवाद' असा करता येईल. म्हणजे, स्वत:चे व्यक्तिमत्व जोपासणे आणि दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचा सन्मान राखणे, 'तुझा विचार मला सपशेल चुकीचा वाटतो तरीही तो चुकीचा विचार मांडण्याच्या तुझ्या अधिकाराकरिता मी प्राण पणाला लावण्यास तयार आहे.' ही 'उदारमतवादा'ची प्रवृत्ती. पण, यातून स्वतंत्रतेच्या विचाराचे एक अंगच स्पष्ट होते. अनेकांनी अधिक समर्पक नाव शोधण्यासाठी खूप खटाटोप केले, पण काही यश मिळाले नाही.

 समर्पक नाव शोधण्यात अडचण येते याचे कारण 'स्वतंत्रता' हा 'वाद' नाहीच, ती एक सम्यक् विचारसरणी आहे. कोणा माणसाच्या, समूहाच्या, समाजाच्या, वर्गाच्या, वंशाच्या, जातीच्या, लिंगाच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे 'वाद'. अनंत, अपार, असीम जगाकडे एका छोट्याशा छिद्रातून पाहिले म्हणजे जे अपुरे दर्शन होते त्यातून एक 'वाद' तयार होतो आणि त्या 'वादा'ला त्या छिद्राचे नाव मिळते. स्वतंत्रतेचा उपासकही जगाकडे त्याच्या छोट्या छिद्रातूनच पाहातो; पण आपल्या छिद्राच्या संकुचितपणाची जाणीव तो ठेवतो. आपले छिद्र अनंतकोटी

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१९१