पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बनवावी लागेल. त्यासाठी शास्त्रीय उपकरणांच्या सहाय्याने मालाची गुणवत्ता/दर्जा ठरवण्याची व्यवस्था तयार करावी लागेल. विकसित देशातील सुपरमार्केटची बाजारव्यवस्था ही अशा प्रकारची गुणवत्तेची बाजारपेठ आहे.
६. शेतकरी आणि ग्राहक एकत्र आणणे
 आपल्या व्यापारात पूर्वापार चालत आलेली आडत्यांची पद्धतीच शेतीमालासाठी कृषि उत्पन्न बाजार समित्यांतही वापरण्यात आली. इतर देशांतल्या व्यवस्थेत, आडते जवळ जवळ नाहीत, असला तर एखाद दुसरा. तेथे शेतकरी आणि ग्राहक एकत्र येतात. त्या दिशेने पहिली पायरी म्हणून हिंदुस्थानातील शेतकरी आणि ग्राहक यांना एकत्र आणणारी एखादी यंत्रणा उभी केली पाहिजे.
७. माहिती तंत्रज्ञानाचे जाळे
 हिंदुस्थानातील शेतकऱ्याला जग काय आहे हे समजायला हवे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगभर इंटरनेट आणि संगणक यांच्या साहाय्याने माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार सुरू झाला आहे. जगामधील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये काय भाव चालू आहेत, कोणत्या मालाला कशी मागणी आहे, पुरवठा कसा आहे, हवामानाचे अंदाज काय आहेत, त्यानुसार पीकसंरक्षणासाठी काय उपाययोजना करता येईल, इत्यादी बाबींची माहिती हिंदुस्थानच्या प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना गावातच मिळण्याची व्यवस्था करावी लागेल.
तात्पर्य

 जागतिकीकरणाच्या वाऱ्याला आता कोणी थोपवू शकणार नाही. जागतिकीकरणाच्या आव्हानाला घाबरून आपल्या देशाच्या सीमांच्या आत दडून बसण्यात देशाचे नुकसानच आहे, फायदा काहीच नाही. तेव्हा, दिवाभीतांच्या घुत्कारांकडे लक्ष न देता वरीलप्रमाणे पावले उचलली तर हिंदुस्थान खुल्या व्यवस्थेच्या जागतिक स्पर्धेतील सक्षम स्पर्धक होऊ शकतो आणि आपले प्राचीनकालीन वैभव पुन्हा प्राप्त करू शकतो.

१८४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने