पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कबुतरांची हिम्मत
 WTO वर टीका करणारे, हिंदुस्थानने WTO मधून बाहेर पडावे असे म्हणणारे विरोधक नेहमी एक युक्तिवाद करतात. "आपण गरीब देश आहोत, आपण तंत्रज्ञानात मागास आहोत; दुसरे देश श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे भांडवल खूप आहे, म्हटले तर ते खूप दिवस बाजारात तग धरून राहू शकतात अशा लोकांबरोबर स्पर्धेत उतरून सामना करणे कसे शक्य आहे?" असे ते म्हणतात. अगदी प्रकाशसिंह बादलांसारखे लोकही अशीच भाषा करतात. मध्ये चंडीगडला त्यांच्याशी बोलताना मी म्हटले की, "तगड्या माणसाशी लढाई करायचीच नाही म्हटले असते तर शिखांचा इतिहास घडलाच नसता." गुरु गोविंदसिंगांचे प्रसिद्ध वाक्य आहे की, 'मी तर बहिरी ससाण्यांच्या विरुद्ध कबूतरांना लढवणार आहे.' आणि गुरु गोविंदसिंगांच्या कबूतरांनीच शीख इतिहास घडवला. तेव्हा, युद्धामध्ये नेहमी तगडेच जिंकतात असे काही नाही.
 तेव्हा, आपण असे धरून चाललो की आपल्याला काही मार्ग काढताच येणार नाही, आणि मार्ग न काढण्याचे ठरवून नुसते 'आमचं आता कसं होणार?' म्हणून हंबरडा फोडत राहिलो तर आपण जगामध्ये राष्ट- म्हणून सोडूनच द्या, माणूस म्हणूनही जिवंत राहणार नाही. कारण, आपण जगाबरोबरचे संबंध तोडून टाकले तर आज जगात संगणक, जैविक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांतीमुळे जी काही नवीन साधने तयार होत आहेत त्यांनाही आपल्याला मुकावे लागेल. परिणामी, उद्याच्या जगात जगणेही अशक्य होईल. तेव्हा जागतिक व्यापार संस्थेपासून आपण दूर राहू शकतो ही कल्पना मुळातून काढून टाकली पाहिजे.
 ससाण्यांविरुद्ध लढलेल्या कबूतरांच्या हिम्मतीने स्पर्धेत उतरायचे ठरले तर स्पर्धेत टिकून रहाण्यासाठी आणि जिंकण्यासाठी काय करायला हवे?
उपायांचा पहिला टप्पा :
१. शेतीचे गैरसरकारीकरण

 सरकारी व्यवस्थापन हे सर्वात गचाळ असते हे आता जगन्मान्य झाले आहे. हिंदुस्थानची शेती ही सरकारी आहे, खासगी नाही. कारण सरकार पाहिजे तेव्हा शेतकऱ्याच्या हातून जमीन काढून घेऊ शकते. आणि म्हणूनच शेतकरी जमिनीत भांडवली गुंतवणूक करू इच्छित नाही. तीच गोष्ट

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१८१