Jump to content

पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ज्या काही जुन्या सवयी लागलेल्या आहेत त्यातून बाहेर पडून एक जागतिक दृष्टिकोन घेऊन त्या दृष्टिकोनामध्ये आपल्या देशाचे भले कसे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. जो देश आम्ही आमच्याच घरामध्ये खिडक्यादरवाजे बंद करून बसू म्हणेल, आमची स्वदेशी भली म्हणेल त्या देशाचे वाटोळे होईल. आपल्या शेजारचा ब्रह्मदेश (म्यानमार) हे त्याचे उदाहरण आहे. हा देश चाळीसेक वर्षे आपल्या देशाचे दरवाजेखिडक्या बंद करून बसला आणि त्यामुळे त्याची काही प्रगती झाली नाही; आज तो मागासातला मागास आणि गरीब देश बनला आहे.
 हिंदुस्थानची परिस्थिती पाहिली तर आपले तंत्रज्ञान, उत्पादनक्षमता हे इतके कमी आहेत की आपण जर दरवाजे बंद करून बसायचे ठरवले तर थोड्याच दिवसांत हिंदुस्थान हा जंगली लोकांचा देश बनेल. जर आपण ठरवले की, नाही, जगातील देशांबरोबर स्पर्धा करायची आहे आणि त्याही बाबतीत आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायचे आहे तर त्याला खऱ्या अर्थाने राष्ट-भिमान किंवा स्वदेशी म्हणता येईल. आम्ही नालायक आहोत, पण नालायकपणा लपविण्याकरिता दरवाजे बंद ठेवणार म्हटले तर त्याला काही, उच्च अर्थाने, राष्ट्रीय भावना म्हणता येणार नाही.
जागतिक लोकशाही

 जागतिक व्यापार संस्थेच्या करारातील एका गोष्टीकडे पाहून कोण्याही देशाने या करारावर सही करण्यास काही हरकत नाही असे माझे आग्रही मत आहे. संयुक्त राष्ट-संघाच्या सर्व व्यवस्थांमध्ये, सर्व संस्थांमध्ये अमेरिकेने आपले एक वैशिष्ट्य, विशेष स्थान ठेवले होते. सिक्युरिटी कौन्सिलमध्ये त्यांना व्हेटोचा अधिकार आहे, जागतिक बँकेचा अध्यक्ष अमेरिकनच असू शकतो, आंतरराष्ट-ीय नाणेनिधीच्या प्रमुखाची नेमणूक अमेरिकेच्या सल्लामसलतीशिवाय होऊच शकत नाही. संयुक्त राष्ट-संघामध्ये अमेरिकेला हे जे विशेष स्थान आहे तसे ते नसेल अशा प्रकारची आर्थिक संघटना असावी असे प्रयत्न आम्ही बरीच वर्षे करीत आहोत. जागतिक व्यापारामध्ये अमेरिकेचा वाटा ५१% आहे. त्यांनी जर ठरवले तर त्यांच्या स्पेशल-३०१ किंवा सुपर-३०१ सारख्या कायद्यांप्रमाणे ते त्यांना पाहिजे त्या अटी इतर देशांवर घालू शकतील. त्यांना काय जरूरी आहे WTO ची? त्यांचे न ऐकून

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१७७