पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टाकायची. समोर दिसणारा कचरा झाडून काढून सतरंजीखाली, कोचाखाली ढकलून ठेवायची. आईनस्टाईनने पाहिले आणि त्याने झाडू हाती घेतऊन व्यवस्थित केर काढून प्रयोगशाळा स्वच्छ करून दाखवली. मोलकरणीनेही कौतुक केले. म्हणजे परिस्थिती अशी की आईनस्टाईन हा प्रयोग करण्यात श्रेष्ठ आणि केर काढण्यातही श्रेष्ठ. मग, कामाची विभागणी कशी करावी? अर्थशास्त्राचा सिद्धांत असे सांगतो की ज्या कामामध्ये ज्याला तुलनेने अधिक श्रेष्ठता असेल ते काम त्याने करावे. प्रयोग करणे आणि झाडू काम करणे यांतील दोघांच्या कार्यक्षमतेची तुलना केली तर झाडूकामात आईनस्टाईन श्रेष्ठ असला तरी त्या कामातील त्याच्या कार्यक्षमतेतील फरक प्रयोग करण्याच्या कार्यक्षमतेतील फरकाच्या तुलनेत अगदी किरकोळ आहे. तेव्हा आईनस्टाईनने प्रयोग करावे आणि मोलकरणीने झाडूकाम करावे असे अर्थशास्त्राचा नियम सांगतो. याला इंग्रजीमध्ये Law of Comparative Advantage (म्हणजे तौलनिक लाभाचा नियम) म्हणतात. या नियमाप्रमाणे जर का सगळ्या जगामध्ये श्रमविभागणी झाली आणि आपण काय काय उत्पादन करायचे हे प्रत्येक देशाचे ठरले तर प्रत्येक देशातील उत्पादन वाढते, प्रत्येक देशातील ग्राहकाचा अधिकाधिक फायदा होतो आणि सगळ्या जगातील मिळून संपत्ती वाढते.
 अशा तऱ्हेने देशादेशांत श्रमविभागणी व्हावी याकरिता GATT ने प्रयत्न केले. १९४३-४४ साली सुरू झालेल्या या चर्चांमध्ये उरूग्वेमध्ये १९८२-८३ मध्ये सुरू झालेल्या फेरीत शेतीमालाच्या व्यापाराचा विषय पहिल्यांदा चर्चेत आला. तोपर्यंतच्या चर्चांमध्ये शेतीविषयी कोणीच बोलायला तयार नव्हते. कारण, शेती हा प्रत्येक देशाचा राजकारणाचा नाजुक विषय आहे. शेतकरी मोठ्या संख्येने असोत का लहान संख्येने असोत, अनेक कारणांकरिता प्रत्येक देशाला शेतीच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असले पाहिजे असे वाटते.
सक्षम बनण्यात खरी राष्ट्रीयता

 खुली व्यवस्था आणताना प्रत्येक देशाला पहिल्यांदा त्या व्यवस्थेचे फायदे समजायला पाहिजेत आणि त्याच बरोबर महत्त्वाचे म्हणजे, राष्ट-ाभिमानाच्या, स्वदेशीच्या नावाने असोत किंवा समाजवादाच्या नावाने,

१७६
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने