पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६. असाध्य ते साध्य करिता सायास

 वाटाघाटींच्या उंबरठ्यावर जागतिक व्यापार संस्थेची (WTO) स्थापना १९९५ साली झाली. उरूग्वे येथे झालेल्या वाटाघाटींच्या शेवटी जे काही आंतरराष्टीय करारमदार तयार झाले त्यांवर १९९५ साली सह्या झाल्या. या करारांतच करारांतील तरतुदींची पुनर्पहाणी करण्याची तरतूद कलम २० मध्ये अंतर्भूत आहे. त्याप्रमाणे, नवीन वाटाघाटी आता सुरू होतील. या वाटाघाटी सुरू होतानाच जागतिक व्यापार संस्था, जागतिकीकरण आणि खुला व्यापार या सगळ्यांनाच विरोध करणाऱ्या मंडळींनी मोठी आघाडी उभी करण्याचा चंग बांधला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये सिएटल येथे मंत्रीस्तरावरील वाटाघाटी चालू व्हायच्या होत्या. तेथे विरोधकांनी रस्त्यांवर दंगली केल्यामुळे त्या वाटाघाटींची बैठक आटोपती घ्यायला लागली. आता नवीन बैठकींची तयारी सुरू असून येत्या एकदोन महिन्यात वाटाघाटींना पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.
विरोधकांचा फुसका आशावाद
 या नवीन वाटाघाटींना सरुवात होण्याआधीच WTO म्हणजे जणू काही एक भयानक राक्षस आहे, WTO म्हणजे आंतरराष्ट-ीय नाणेनिधी, जागतिक बँक यांनी केलेला एक कट आहे अशा तऱ्हेची प्रचारकी भाषा वापरून WTO च्या वाटाघाटींना आपण जाऊच नये, आणि जावे लागलेच तरी त्यातून बाहेर पडावे अशा प्रकारचे प्रस्ताव WTO विरोधक मांडीत आहेत. काही लोकांच्या मनात अजून आशा आहे की जागतिकीकरण आणि जागतिक व्यापार संस्था या गोष्टी प्रत्यक्ष अंमलात येणारच नाहीत. कारण, व्यापार खुला करण्याच्या बाबतीमध्ये श्रीमंत देशांतसुद्धा एकमेकांत वादावादी आहे, मतभेद आहेत. यूरोपला वाटते की अमेरिकेने जास्त उदार धोरण घ्यावे, अमेरिकेला वाटते की यूरोपने घ्यावे, जपानने घ्यावे आणि, त्यांच्यामध्ये लगेच उद्या काही एकमत होईल अशी लक्षणे दिसत नाहीत. आणि मग, या वादांपैकी एखाद्या मुद्द्यावर सगळ्याच वाटाघाटी मोडतील अशा आशेने काही मंडळी वाट पहात आहेत.
दिरंगाईची किंमत

 मराकेश येथे जागतिक व्यापारासंबंधी करारांवर सही करण्यात, विशेषतः गरीब देशाच्या सरकारांनी चालढकल केली, वेळ लावला. आणि

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१७१