Jump to content

पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आधारे, निर्यात म्हणजे अधिक उत्पादन, म्हणजे अधिक रोजगार, म्हणजे अधिक भरभराट असे सूत्र मांडता येईल. उलट, आयात म्हणजे उत्पादनात घट, रोजगारात घट आणि, परिणामी, मंदी हे उघडच आहे. या कारणास्तव जो तो देश अधिकाधिक उत्पादन करून आपल्या मालाला बाजारपेठ शोधण्यासाठी अव्याहत भगीरथ प्रयत्न करीत आहे.
 पण, आयात म्हणजे वरपासून खालपर्यंत नुकसानीचीच बाब ही कल्पना खरी नाही. जगाशी व्यापारी संबंध ठेवणे, इतर देशांशी वस्तू वा सेवा यांची देवघेव करणे हे लाभदायक आहे यात काही शंका नाही. जागतिक व्यापारामुळे जो तो देश ज्या वस्तू उत्पादन करण्यात काही नैसर्गिक सोय असेल त्याच वस्तू तयार करतो. जागतिक श्रमविभागणी होते आणि निर्यात करणाऱ्यांचा तर फायदा होतोच होतो; पण, आयात करणाऱ्यांचादेखील फायदा होतो.
 जगाशी संपर्क तेवढा वाईट ही कल्पना इंग्रजी अमदानीच्या पहिल्या काळात आग्रहाने, राष्ट-वादी आवेशाने त्या काळचे पुढारी मांडीत, अपवाद फार थोडे. त्यातील एक जोतिबा फुले. “इंग्रजांचे राज्य आले नसते तर बरे झाले असते. पण आले आहे हे खरे. ते काही कायम टिकणार आहे असेही नाही. कधीतरी त्यांना या देशावरील सत्ता सोडून द्यावीच लागेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण, इंग्रजांच्या संपर्काचे काही विलक्षण लाभही समोर वाढून आले आहेत. इंग्रजी राज्यामुळे नवे ज्ञान आले, तंत्रज्ञान आले. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तो मिळू लागला. अशा परिस्थितीत, इंग्रजांविरुद्ध विद्वेष पसरवून सामाजिक सुधारांखेरीज राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरणे म्हणजे इंग्रजांनंतर पुन्हा एकदा पेशवाईलाच निमंत्रण देणे आहे.” असे जोतिबा फुलेंनी स्पष्ट केले आहे.
 जगाशी जितका अधिक संपर्क तितकी माणसाची आणि पर्यायाने, देशाची क्षितिजे रुंदावतात हा एकच फायदा “केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार....” ही उक्ती सिद्ध करण्यास पुरेसा आहे.

 एका उदाहरणाने ही कल्पना स्पष्ट व्हावी. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देश आकारमानाने हिंदुस्थानच्या तुलनेत अगदीच लहान. आज भारतीयांत गणकयंत्राच्या क्षेत्रात आपल्याला काही विशेष बुद्धी आहे अशी एक सार्वत्रिक

१६८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने