पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उघडताना पूर्ण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि परदेशी व्यापाराचा देशी उद्योजकांवर व अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत नाही ना हे कसोशीने तपासून पाहिले पाहिजे.” असे त्यांनी सांगितले.
 कोणत्याही कार्यक्रमाविषयी बोलताना त्या कार्यक्रमाचा काही विपरीत परिणाम आपल्या देशावर होत नाही ना हे तपासून पहाणे योग्यच आहे. त्यात विशेष आग्रहाने निवेदन करण्यासारखे काहीच नाही. श्री. गुजराल यांच्या सरकारने ऑस्ट-लियातून गहू मागविला. गहू खरेदी करण्याची इतकी घाई त्यांच्या सरकारला झाली होती की, गव्हाच्या सर्वसाधारण तपासणीलासुद्धा फाटा देण्यात आला. पोत्यातील गव्हाबरोबर काही विषारी वनस्पतींची बियाणी आली; ती सर्वत्र पसरली असती तर गव्हाच्या प्रदेशातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असते. किंबहुना, पंडित नेहरूंच्या काळात गव्हाच्या आयातीबरोबर 'काँग्रेस गवता'चे जे तण घुसले आणि शेतकऱ्यांना त्याने 'दे माय, धरणी ठाय' करून सोडले तसा प्रकार झाला असता. परदेशातून कोणताही माल आला, फार काय, कोणी माणूसही आला तरी त्याच्याबरोबर जंतुंची, रोगराईची आयात होण्याचा धोका संपूर्ण नाकारणे शक्य नाही. जुन्या काळात परदेशात जाऊन आलेल्या कोणाही भारतवासीयास प्रायश्चित्त घ्यावे लागे त्यामागे, कदाचित अशा प्रकारची काही धास्ती असण्याची शक्यता आहे. तरीही, भारतीय परदेशात जातात, अभिमानाने जातात; प्रायश्चित्त दूरच राहिले, आपल्या देशपर्यटनाची बढाई मारतात. कारण, परदेशाच्या संपर्काने काही धोका निर्माण होत असला तरीही त्यापासून होणारे लाभाचे प्रमाण इतके प्रचंड आहे की, परदेशसंपर्काच्या अपायकारक बाबींकडे आता कोणी फारसे लक्ष देत नाही.

 समाजवादी नियोजनाच्या काळात परदेशी चलनाची चणचण होती. त्यामुळे, निर्यात आणि आयातीला पर्याय या दोन गोष्टींना मोठे महत्त्व दिले जात होते. निर्यात करणे म्हणजे परदेशी चलन कमविणे, म्हणजे परदेशातून हव्या त्या वस्तू विकत घेण्याचे सामर्थ्य मिळविणे असे झाले. याउलट, आयात करणे म्हणजे दुर्लभ परकीय चलनाचा अपव्यय करणे झाले. थोडक्यात, निर्यात तेवढी चांगली आणि आयात सर्व विनाशकारक अशी कल्पना दृढ होऊन बसली. या कल्पनेत थोडेफार तथ्य आहे. केन्स यांच्या अर्थशास्त्राच्या

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१६७