पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५. खिडकीला दिशा दोन


 केरळातील कोण्या ॲलेक्झांडरबाईंनी आपल्या तीसचाळीस महिला सहकाऱ्यांबरोबर न्यूयॉर्क शहरात मोर्चा काढला. बाईंची आणि त्यांच्या साथीदारांची तक्रार अशी की, जागतिकीकरणामुळे केरळातील मासेमार कोळ्यांच्या पोटावर पाय येत आहे; या नव्या स्पर्धेमुळे त्यांना जगणे अशक्य झाले आहे.
 परदेशी बाजाराबद्दल हिंदुस्थानात विचित्र विचित्र कल्पना ऐकू येतात. आपल्याकडून हापूस आंब्याची परदेशी निर्यात झाली तर "आता सगळे चांगले आंबे परदेशात जाणार आणि आपल्याला ते खायला मिळणार नाहीत" अशी तक्रार होते. उलटपक्षी, ऑस्ट-लियातून आलेल्या सफरचंदापुढे देशी फळांचा काय टिकाव लागणार? मग, देशातील शेतकऱ्यांनी कोणत्या आधारावर जगावे?" असेही प्रश्न विचारले जातात. 'ओली पडो की सुकी', नुकसान आपलेच अशी एक पराभूत मनोवृत्ती हिंदुस्थानात सर्वदूर आढळते.

 जागतिक व्यापार संस्थेच्या वाटाघाटींना सुरुवात झाल्यापासून वास्तवातील भीतीपेक्षा या काल्पनिक कथांची भूते लोकांच्या मानगुटीवर बसविली जात आहेत. दिल्लीपासून ते चेन्नईपर्यंत सगळीकडे गेल्या दोन महिन्यात एकच अफवा पसरली आहे की, “युरोपातून पाचसाडेपाच रुपये प्रति लिटर किंमतीने दूध आयात करून विकले जात आहे.” हिंदुस्थानातील दुधाची किंमत सर्वसाधारणपणे १५ रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे आणि तरीही, गायीम्हशी पाळून कोणी इमले चढविले असे काही ऐकीवात नाही. अशा परिस्थितीत, "परदेशी दूध इतके स्वस्त मिळू लागले तर येथील गवळ्यांना विष पिऊन आत्महत्या करण्यापलिकडे गत्यंतरच नाही" असा बोभाटा केला जात आहे. इतक्या जणांनी इतक्या वेळा वेगवेगळ्या ठिकाणी ही कथा माझ्या कानावर घातली की, थोडीफार तरी चौकशी करणे आवश्यक झाले. चौकशीअंती 'साडेपाच रूपये दूध' म्हणजे 'पिंपळाच्या झाडावरचा मुंजा अमक्याने पाहिला, तमक्याने पाहिला' अशा भूतकथांसारखी ठरली. युरोपातील दूध हिंदुस्थानातील दुधापेक्षाही अधिक महाग आहे. डॉ. कुरियन साहेबांच्या 'दूध महापूर' योजनेसाठी युरोपातील देशांनी देणगीदाखल दुधाची

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१६५