पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारत मागासलेला राहिला. एकूण जमिनीपैकी ४० टक्के जमिनीत युरियाचा पहिला कणही पडलेला नाही. खात्रीशीर रसायनमुक्त शेतीमाल मिळण्याचे भारत हे मोठे केंद्र होऊ शकते. आपले मागासपण येथे वरदान ठरणार आहे. देशात औषधी आणि सुगंधी वनस्पतींची असीम विपुलता आहे. बी- बियाण्यांच्या संशोधनात आमचे शास्त्रज्ञ जागतिक पातळीवर काहीसे कमी पडले असतील, पण संकरित वाण तयार करण्याची कुशलता येथील शेतकरी स्त्रियांनी इतक्या अद्भुत तऱ्हेने दाखविली आहे की, संकरित वाणांच्या गुणनाची मक्तेदारी भारत प्रस्थापित करू शकतो.
 थोडक्यात, 'नाचता न येणारे' अंगण वाकडे असल्याची तक्रार करीतच राहणार. खरा नर्तक कशाबशा चोपडलेल्या पंधरावीस चौरस फुटांच्या अंगणातही आपले सारे कसब दाखवू शकतो. भारतीय शेतकरी शतकानुशतके शोषणाचा बळी ठरला आहे. या प्रदीर्घ वनवासात त्याने अंगी बाणवून घेतलेले सोशिकता, धडाडी आणि कष्टांची तयारी हे गुण त्याला नव्या कालखंडात मोठे उपयोगी ठरणार आहेत.
 सरकारी हस्तक्षेपाने आजपावेतो भारतीय शेतकरी नागविला गेला. आपल्या शेतात एका दाण्याचे शंभर दाणे करण्याचा गुणाकार करणारा शेतकरी दरिद्री राहिला. जगातील शेतकी तंत्रज्ञानाची विद्या येथल्या शेतकऱ्यांना मिळावी आणि त्यांनी पिकविलेला माल नोकरशाहीने लुटून नेऊ नये ही मागणी जोतिबा फुल्यांपासून इमानदार शेतकऱ्यांनी केलेली आहे. खुली व्यवस्था आणि जागतिकीकरण यांच्या धक्क्याने सरकारी दंडबेड्या खळाखळा तुटून पडू लागल्यावर 'इंडिया'तील काही सज्जन चिंताग्रस्त झाले आहेत आणि ते शेतकऱ्यांना आपल्याच हाताने दंडबेड्या चढवून घेण्याचा आग्रह करीत आहेत. त्यापलीकडे जाऊन, "दंडबेड्यांत राहणे हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे" अशा आरोळ्याही ते ठोकू लागले आहेत.

 पिंजऱ्यातील प्राणी त्यातून निसटून जाण्याची संधी मिळाली तर कसा वागतो यावरून त्या प्राण्याची प्रकृती सांगता येते. वाघ असेल तर छलांग मारून तो बाहेर पडतो. 'उद्या शिकार मिळेल किंवा नाही, उपाशी तर रहावे लागणार नाही ना' हा विचारही त्याच्या मनात येत नाही. कुत्रा मात्र गळ्यातील पट्ट्याचेच भूषण मानतो आणि सुटून गेल्यावरही भाकरीच्या वेळी

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१६३