पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या देशाचेही भले होत नाही आणि जागतिक अर्थव्यवस्थेचे तर नाहीच नाही. 'स्वदेशी स्वदेशी' असा 'उदे उदे' करीत जो तो दुसऱ्याच्या पायात पाय घालून त्याला पाडण्याचा प्रयत्न करतो; परिणामतः, सारेच आडवे पडतात. दुसऱ्या महायुद्धापूर्वी हिटलरच्या नेतृत्वाखाली अशा तऱ्हेच्या राष्ट-वादी धोरणांची सुरुवात झाली. त्यातून दुसरे महायुद्ध उभे राहिले आणि आंतरराष्ट-ीय व्यापार जवळजवळ बंद पडला. जो तो देश सर्वार्थी स्वयंभू होण्याचा प्रयत्न करील तर त्यात राष्ट-प्रेमाचा आविष्कार दिसेल, कदाचित; पण, त्यामुळे सर्वत्र अकार्यक्षमता माजेल, उत्पादन घटेल आणि सर्वसामान्यांचे जीवनमान खालावेल.
 देशादेशांतील श्रमविभागणी कोणत्या आधारांनी व्हावी, त्यांचा नियम काय असावा यासंबंधी अर्थशास्त्राचा एक सर्वमान्य सिद्धांत आहे. तो समजाविण्यासाठी एक चांगले उदाहरण घेता येईल.
 आइनस्टाइनसारखा विश्वविख्यात वैज्ञानिक विश्रांतीसाठी काही काळ दूर जंगलातील घरात जाऊन रहातो; बरोबर फक्त एक हरकाम्या गडी घेतो. जंगलातील वास्तव्याच्या काळात आइनस्टाइन आणि त्याचा गडी यांनी कामाची वाटणी एकमेकात कशी करून घ्यावी? घरगडी झाडूकामात निष्णात आणि आइनस्टाइनला संशोधनात तोड नाही अशी परिस्थिती. कामाची वाटणी करण्यात काही अडचण नाही; गडी झाडू मारेल आणि आइनस्टाइन संशोधन करेल! काही चमत्काराने घरगडी कार्यक्षम वैज्ञानिक झाला तर ते एकमेकात कामांची अदलाबदल करून घेऊ शकतात. पण, समजा, आइनस्टाइन श्रेष्ठ वैज्ञानिक तर आहेच, वर झाडूकामातही तो घरगड्यापेक्षा उजवा आहे असे लक्षात आले तर दोघांनी कामाची वाटणी कशी करावी? दोन्ही कामात आइनस्टाइन सरस, मग काय त्याने झाडूकाम करावे आणि वर, प्रयोगशाळेत जाऊन संशोधनही करावे?

 अर्थशास्त्रातील व्यापारविषयक सिद्धांत सांगतो की, याही परिस्थितीत आइनस्टाइनने संशोधन करावे, झाडूकामात वेळ घालवू नये. कारण, संशोधनक्षेत्रातील त्याचे श्रेष्ठत्व घरकामातील त्याच्या सरसतेपेक्षा अधिक आहे. प्रत्येक देशाने, ज्या उत्पादनात त्याचे तुलनेने अधिक श्रेष्ठत्व आहे त्याकडे अधिक लक्ष द्यावे. अमेरिका गणकयंत्रशास्त्रात हिंदुस्थानपेक्षा सरस

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१५७