Jump to content

पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधिक व्यापक तरतुदी आंतरराष्ट-ीय व्यापारव्यवस्थेसाठी करणे आवश्यक किंवा उपयुक्त ठरेल काय अशा प्रश्नांवर या वाटाघाटी होतील. प्रत्येक राष्ट-ाच्या आर्थिक जीवनमरणाचा हा प्रश्न असल्याने तेथे जाणारे सारे प्रतिनिधी सज्जड आकडेवारी आणि युक्तिवाद प्रस्ताव तयार करून जाणार. शेतीव्यापारासंबंधी इतर काही देशांतील तज्ज्ञ मला भेटून या विषयावर चर्चा करून केव्हाच गेले. आपल्या देशात 'शेतीव्यापाराच्या जागतिकीकरणाच्या संदर्भातील समस्या' या विषयावर एक प्राथमिक चर्चा झाली; पण, वाटाघाटीत नेमकी कोणती भूमिका घ्यायची, वाटाघाटींच्या रस्सीखेचीत प्रत्येक प्रस्तावावर आपल्या बाजूने कोणते देश उभे राहतील आणि विरुद्ध बाजूला कोण उभे राहतील याची प्राथमिक चाचपणीदेखील अजून व्हायची आहे. निश्चित माहिती नसली की अज्ञानाच्या अंध:कारात साहजिकच मनात भीती उभी राहते. साऱ्या देशभर, देशादेशांतील व्यापार अटकविणाऱ्या भिंती तोडून सारे जग एकत्र आणणे म्हणजे काही भयाण राक्षसी घटना घडली आहे अशी कल्पना अनेकांनी करून घेतली आहे. अनेक वर्षे विलायती सत्तांनी हिंदुस्थानची लूट केली; इंग्रजांनी तर येथे साम्राज्य स्थापले. त्यामुळे, देशाच्या सरहद्दीपलीकडील सर्व शक्तींबद्दल हिंदुस्थानच्या मनात एक भीतीची भावना आहे. परदेशांशी जेथे जेथे आपला संबंध येईल तेथे तेथे आपले नुकसानच होणार अशी अनेकांची ठाम समजूत आहे. जागतिक व्यापार हा विषय तसा समजण्यास सोपा नाही. सर्वसाधारण लोकांना 'निर्यात केली तर डॉलर मिळतात आणि आयात केली तर डॉलर द्यावे लागतात; तस्मात्, निर्यात करणे चांगले' एवढेच काय ते आंतरराष्टीय व्यापाराबद्दल समजते!

 "तरीही, हापूस आंबा भारतातून निर्यात होऊ लागला हे काही फार चांगले झाले नाही; आता आपला आंबा गोरे खाणार आणि आपल्याच देशातील लोकांना तो चाखावयासदेखील मिळणार नाही ही गोष्ट काही बरी नाही" ही भीती समजण्यासारखी आहे. पण त्याबरोबरच, ऑस्ट-लियातून येथे सफरचंद आले तर तेथे पिकलेले उच्च प्रतीचे फळ आपल्याला खायला मिळणार याचा आनंदही व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात निर्यात होवो का आयात, आपले नुकसानच नुकसान होणार आहे अशी आपली 'हिंदुभावना' आहे. समुद्रपर्यटनातील हजारो वर्षांच्या बंदीतून आणि परकीय आक्रमकांपुढे हजारो

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१५५