पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४. WTO च्या धर्मक्षेत्री, कुरुक्षेत्री


 म्हणता म्हणता २००० साल उगवले आणि दोन तृतीयांश संपलेही. १ जानेवारी २००१ ही तारीख काही फार लांब राहिलेली नाही. डंकेल प्रस्तावावर चर्चा चालू होती त्यावेळी जागतिक व्यापार खुला करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या सर्व सदस्य राष्ट-ांनी ज्या ज्या अनेक शर्तीची पूर्तता करण्याचे मान्य केले होते, त्यासाठी मुदती ठरवून देण्यात आल्या होत्या; काही शर्तीसाठी जानेवारी २००१, तर दुसऱ्या काही शर्तींसाठी जानेवारी २००३. मॅराकेश येथे १९९४ मध्ये, करारावर सही करताना अनेकांची भावना अशी होती की, २००१ साल तर अजून खूप दूर आहे, पुढचे पुढे पाहून घेऊ. दरम्यान, काही चमत्कार होईल आणि आपण घेतलेल्या जबाबदाऱ्या प्रत्यक्षात पार पाडण्याची वेळ येणारच नाही अशा भोळसट आशेत ज्या अनेक देशांची सरकारे राहिली त्यांच्या यादीत हिंदुस्थानचा क्रमांक, अर्थातच शिरोभागी होता. शहामृगाची शिकार करण्याकरिता एखादा रानटी प्राणी त्याचा पाठलाग करू लागला की तो पळू लागतो. त्याच्या पळण्याचा वेग इतर कोणत्याही प्राण्याच्या तुलनेने कितीतरी फार अधिक असतो. पळून पळून दमला की शहामृग उभा राहतो आणि जवळपासव्या वाळूत किंवा मातीत डोके खुपसतो. बाहेरचे जग दिसेनासे झाले की मग आपणही जगाला आता दिसणार नाही, तेव्हा आता जगापासून आपल्याला काही धोका नाही अशी त्याची समजूत होते असे म्हणतात. कोणताही प्राणी इतका मूर्ख असू शकेल काय याबद्दल चर्चा होऊ शकते. पण, आंतरराष्ट-ीय व्यापार खुला करण्याच्या बाबतीत हिंदुस्थान शासनाची अवस्था त्या शहामृगासारखीच झालेली दिसते. हिंदुस्थानातील वनस्पतींसंबंधी बौद्धिक संपदेचे रक्षण करण्यासाठी आपल्या परिस्थितीस अनुरूप असा कायदा हिंदुस्थान सरकारने लोकसभेत संमत करून घ्यायला पाहिजे होता; प्रत्यक्षात आजपर्यंत अशा विधेयकाचा मसुदादेखील तयार झालेला नाही.

 आंतरराष्ट-ीय व्यापार संघटना लवकरच वाटाघाटींच्या दुसऱ्या एका फेरीला सुरुवात करणार आहे. १९९४ साली स्वाक्षरी झालेल्या कराराची पूर्तता किती प्रमाणात झाली, मागील करारांच्या तरतुदींपेक्षा काही वेगळ्या किंवा

१५४
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने