पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विपुलताच इतकी असते की दुकानात प्रवेश करतानाच जी वस्तू विकत घेण्याचा मनात इरादाही नसतो अशा वस्तूही गिऱ्हाईक कळत न कळत घेऊन टाकतो. व्यापारी उलाढाल वाढते.
 परदेशातील मी पाहिलेली काही सुपर मार्केटस् म्हणजे आपल्याकडील तथाकथित सुपर मार्केटपेक्षा सहस्रपटींनी अजस्र. एकेक दुकान म्हणजे कित्येक मजल्यांची इमारत असते. सर्वसाधारण सुपर मार्केटमध्ये किराणा, भुसार, डेअरी, पोल्ट-ी, मटन, चहासाखरेपासून ते केवळ विवाहप्रसंगी उपयोगी येणाऱ्या १० फूट उंचीच्या शोभिवंत केकपर्यंत सर्व काही मिळते. कापड विभागात गेलात तर कापडचोपड, त्याशिवाय सतत नवनवीन बदलणाऱ्या फॅशनचे स्त्री-पुरुषांचे अनेक तऱ्हांचे पेहराव, त्यांच्या किंमती अशक्यप्राय वाटाव्या इतक्या स्वस्त. दर दोन तीन महिन्यांनी तेथे सेल लागतात. त्यावेळच्या किंमती पाहिल्या तर दुकानदारांचा चरितार्थ कसा चालत असेल याची चिंता वाटते. औषधे, प्रसाधने, खेळणी असे शेकडो विभाग. त्याखेरीज, खास वस्तूंकरिता वेगवेगळी दुकाने असतात. एक सुपरमार्केट केवळ पुस्तकांचेच, एक केवळ गणकयंत्रांचेच. एक केवळ घरदुरुस्तीसाठी लागणाऱ्या सामानांचे. ऑफिसकामासाठी लागणाऱ्या स्टेशनरी सामानाचे भव्य दुकान आणि त्यातील विविध सामानांची रेलचेल पाहून मी तर थक्क झालो. दुकानांचे वर्णन करताना जुन्याकाळी 'पीन टू पियानो' असे वर्णन करीत आता 'टाचणी ते विमान' सर्व काही येथे मिळते असे म्हटले तरी ते पुरेसे नाही. सर्वत्र, एखाद्या गर्भश्रीमंत वाटणाऱ्या मुलीला दुकानात जाऊन विक्रेतीचे काम करताना पाहिलं म्हणजे आश्चर्य वाटते. सुपर मार्केट यंत्रणांमुळेच मोलकरणीला सरदारणींप्रमाणे पेहराव करण्याची शक्यता तयार झाली असे एका लेखकाने म्हटले आहे. पाश्चिमात्य समाजातील गरीब आणि श्रीमंत ही विषमता नष्ट झाली ती समाजवादाचे उद्गाते मार्क्स आणि एंगल्स यांच्यामुळे नाही तर 'मार्क्स आणि स्पेन्सर' नावाच्या इंग्लंडमधील सुपर मार्केट यंत्रणेसारख्या व्यवस्थांमुळे होय.
यशाचे गमक

 हा चमत्कार घडतो कसा? सुपर मार्केटच्या व्यवस्थापनावर पुरा प्रबंध लिहिण्याची ही जागा नव्हे. त्यांच्या कार्यपद्धतीची दोन तीन महत्त्वाची सूत्रे

खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने
१५१