पान:खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने (Khulya Vyavasthekade Khulya Manane).pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भांडवलाला 'धाडसी भांडवल' म्हणतात. आपल्याकडे अनेक बँका आहेत; वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था आहेत. त्यांच्याकडे असा कोणी धाडसी उद्योजक तरुण गेला तर त्याचे म्हणणे कोणी धड ऐकूनसुद्धा घेणार नाही. त्याला भांडवल पुरवण्याची गोष्ट दूरच राहली. समजा, धाडसी भांडवलाचाही प्रश्न सुटला- यासाठी बहुधा घरगुती वित्तपुरवठ्याचाच उपयोग होतो – तरी बाजारपेठेचा प्रश्न शिल्लक राहतोच. माल तयार करायचा, पण त्याला बाजारपेठ असली म्हणजे निदान उत्पादनखर्च भरून येण्याइतकी किंमत देणारा ग्राहक असला, तर उत्पादनाच्या खटाटोपाला काही अर्थ आहे. ती समस्या शेतकऱ्यांच्या बाबतीत जितकी खरी तितकीच छोट्या उद्योजकांच्या बाबतीतही खरी आहे. सुलभ बाजारपेठेच्या अभावी मग छोटे उद्योजक कोणा बड्या कारखानदाराच्या जाळ्यात अडकतात. मोठ्या कारखान्यात जुळणी होणाऱ्या मालासाठी मोठ्या प्रमाणावर किरकोळ फुटकळ भाग लागतात. त्यांचा घाऊक पुरवठा करण्याचे काम लघुउद्योजक स्वीकारतात आणि काही काळ त्यांना मोठा आनंदाचा आणि भरभराटीचा वाटतो. उत्पादन सुधारण्यासाठी नवनवीन संशोधनाची गरज नाही, कारखानदाराने दिलेल्या आराखड्याप्रमाणे आणि तपशीलाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे आणि कारखानदाराला विकायचे. थोडक्यात, डोक्याला कटकट म्हणून नाही. थोड्याच दिवसात हे चित्र बदलू लागते. जुळणी करणारे मोठे कारखानदार फुटकळ भाग अधिकाधिक स्वस्त मिळावे यासाठी त्यांचा पुरवठा करणाऱ्या छोट्या उद्योजकांची गळचेपी करू लागतात. मग या छोट्या उद्योजकांना विश्व आठवते. कर्जात बुडालेला शेतकरी विष पिऊन जीव देतो तसे प्रत्यक्षात छोट्या उद्योजकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर घडत नाही किंवा घडले तरी त्याचा फारसा गवगवा होत नाही एवढेच. अन्यथा, बाजारपेठेची समस्या शेतकरी आणि छोटा उद्योजक या दोघांचीही सारखीच.
कारखानदारांचे लाड

 भारतातील बाजारपेठेच्या व्यवस्थेत सुखी म्हणायचे ते मोठे उद्योगपती, पुढारी आणि नोकरशहा यांच्या मदतीने लायसेन्स परमिट मिळवावे, उत्पादनाच्या त्या क्षेत्रात मक्तेदारी ठेवावी, परदेशातूनही स्पर्धा करण्यासाठी आयात होणार नाही अशी शासनाकडून तरतूद करून घ्यावी.

१४८
खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने