पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असेच कार्य गोविंदराव कोरगावकर, प्रभाकरपंत कोरगावकर यांनीही केले. शिवराम हरी गद्रे म्हणजे अप्रसिद्ध समाज हितैषी. वि. स. खांडेकर साहित्य व चित्रपटासाठी कोल्हापुरात आले पण त्यांनी येथील साहित्य, संस्कृती, शिक्षण समृद्ध केलं. ही सारी मंडळी मूळ कोकणातली. कष्टाळू, काटकसरी असलेले हे समाजसेवी व्यक्तिगत जीवनात साधे पण समाजजीवनात कार्य श्रीमंत! दलितमित्र बापूसाहेब पाटील यांनी आयुष्यभर दलित वस्त्या, झोपडपट्टी संघाचे कार्य करून बहिष्कृत व अत्याचारित वर्गास समाजाच्या मध्य प्रवाहात आणले. त्यांच्या पत्नी प्राचार्या लीलाताई पाटील यांनी शासकीय सेवेत राहूनही रचनात्मक कार्य करता येते हे दाखवून दिले. त्यांचे खरे जीवनकार्य अण्णा हजारेंप्रमाणे निवृत्तीनंतर सुरू झाले. त्यात त्यांनी कळस गाठला. त्यांनी बालशिक्षण, बालहक्क, शिक्षण व शिक्षक गुणवत्ता आपले जीवितकार्य बनविले. कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. डॉ. एन. डी पाटील, कुलगुरु रा. कृ. कणबरकर, बाबूराव धारवाडे यांनी पुरोगामी समाज प्रबोधन व समाज संगठन कार्यात जागल्याची (Whistle Blower) भूमिका बजावली. जागतिकीकरणाविरुद्ध, प्रतिगामी शक्तींविरुद्ध ते सतत समाजास जागे करत राहिले. अशा दिग्गजांशिवाय काही पणत्या, काही काजवे, काही कवडसेही तुम्हास या संग्रहात मिळतील. ते छोटे म्हणून त्यांचे काम छोटे असे मला वाटत नाही. त्यांनी आपापल्या परीने कार्य करून समाजाबद्दलची तळमळ स्पष्ट केली.
 सन १९९० च्या दरम्यान भारतात मुक्त व्यापार डंकेल करार, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. भारत हा त्या वेळी तिस-या जगातील विकसनशील देश मानला जात होता. देशावर मोठे कर्ज होते. साक्षरता, आरोग्य, गरिबी, लोकसंख्या, दारिद्र्य निर्मूलन असे मोठे प्रश्न देशाला भेडसावत होते. या काळात मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय समाजसेवी संघटनांनी वरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लक्षावधी डॉलर्सची मदत भारतास देऊ केली. त्यातून स्वयंसेवी संस्था (एन.जी.ओ.) उदयाला आल्या. वंचित विकास, दलितोद्धार, स्त्री सबलीकरण, कुपोषण, अनाथ मुलांचे दत्तकीकरण, अपंग विकास, पर्यावरण संरक्षण, विकास नीती, कुटुंब नियोजन, एड्स नियंत्रण इ. कार्यासाठी रोज नव्या संस्था स्थापन होऊ लागल्या. त्यांचे कार्य तुटलेल्या बेटाप्रमाणे होत राही. त्याच दरम्यान भारतात व्यावसायिक शिक्षणाचे पेव फुटले. एम.बी.ए.,एम.एस.डब्ल्यू.,