पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आय.आय.एम्. सदृश्य पदवीधारकांची नवश्रीमंत फौज तयार झाली. त्यातून वेतनाश्रयी समाजसेवकांची पिढी उदयास आली. तंत्रज्ञान, वैश्विकीकरण, वर्ग विकास इ. नव संकल्पनांमुळे त्याग, समर्पण, नैतिकता, सेवा, सचोटी इ. मूल्ये कालबाह्य ठरली. यातून समाज आत्मकेंद्री झाला. मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग बनला. समाजात दोनच वर्ग उरले, गरीब व श्रीमंत. मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद मोडीत निघाले. परिणामी ‘मी आणि माझ’, ‘मला काय त्याच’, ‘पावलापुरता प्रकाश' असं नवं जीवन तत्त्वज्ञान उदयास आलं.
 आज समाज स्थिती अशी आहे की, गरीब असंघटित वर्गास कोणी वाली उरला नाही. शासकीय, खासगी सर्व स्तरावर सततच्या वेतनवृद्धीमुळे जीवनमान उंचावले. शिक्षण हे ‘मूल्य' न राहता ‘किंमत' झाले. जगण्याच्या जीवघेण्या स्पर्धेने माणसास यंत्र बनवले. परिणामी समाजसेवेचे पण व्यावसायीकरण झाले. यामुळे सेवा संस्था व कॉर्पोरेट हाउसमधील अंतर संपले. शिक्षणास बाजाराचे स्वरूप आले. माणसाचे मोल ‘मूल्य' न राहाता त्याची किंमत ‘गि-हाईक झाली. राजकीय जीवन भ्रष्टाचाराचे साधन म्हणून विकसित झाल्याने समाजापुढे आदर्श राहिला तो केवळ पैशाचा. अशाही स्थितीत जे काम करत राहिले- त्यांना ‘सेलिब्रेटी’ महत्त्व आले.
 सन २००० नंतरचं समाजजीवन एकविसाव्या शतकाची साक्ष घेत आकारलं. सरकारांनी कल्याणकारी कार्यातून काढता पाय घ्यायला सुरुवात केल्याने सर्वाधिक परवड जर कुणाची झाली असेल तर ती वंचित समाजाची. ‘ज्यांना काहीच नाही, त्यांना सर्वकाही' असं स्वातंत्र्याच्या वेळी सांगितलं जायचं. वर्ग विकास (Mass Development) ध्येय असल्याने शासन 'Welfare State' होते. जागतिकीकरणाने विकास व कल्याणाच्या घड्याळाचे काटे उलटे फिरवले गेले. पोलीस, प्रशासनाकडे असलेला नव्या पिढीचा ओढा सेवा धर्माचा नाही, असेलच तर सत्तेचे साधन हाती हवे,अधिकार हवा,प्रतिष्ठा हवी व या साच्यातून स्वविकास एवढेच उद्दिष्ट होऊन गेले. कर्तव्यापेक्षा अधिकार जागृत समाज संघटनांच्या जोरावर कर्तव्यपराङ्मुख झाला. सर्वसामान्य माणसाची किंमत ‘शून्य' करणारी एक नवश्रीमंत संस्कृती उदयास आली.
 अशा पार्श्वभूमीवर ‘कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक' हे पुस्तक नकारात्मक जीवन जगणाच्या वर्तमान समाजास पुन्हा एकदा