पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रा.संभाजी जाधव, प्रा. चंद्रकांत पाटगावकर प्रभृती मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्याबरोबर मला सामाजिक, शैक्षणिक कार्य करण्याची संधी मिळाली. कामाचे स्वरूप, संस्था उभारणी, संघटना बांधणी असे होते. या सर्वांकडून मला भरपूर शिकायला मिळाले.
 ‘कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक'मधील व्यक्तिचरित्रे संग्रह रूपात आज देण्याचे विशेष प्रयोजन आहे. या संग्रहातील अधिकांश चरित्रे आपापल्या क्षेत्रातील मातब्बर मंडळी होत. त्यांनी आपल्या समाजसेवेचे क्षेत्र निश्चित केले होते. त्यातील कोणीही आपण करीत असलेल्या समाजकार्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हता. उलटपक्षी त्यांनी जे काय केले ते निरपेक्षपणाने व पदरमोड करून. उपजीविकेसाठी कुणी नोकरी, व्यवसाय करायचे. कुणी कुणी तर ठरवून पूर्णवेळ समाजसेवक होते. तो काळ स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीचा होता. त्यांच्यापुढे स्वातंत्र्यपर्व काळातील ऋषितुल्य समाजसेवकांचे कार्य होते. त्यांच्यात ध्येयवाद, समर्पण, त्याग, सचोटी होती. त्यांनी केलेले कार्य काळाच्या संदर्भात मोठे असले तरी त्यांना सतत असे वाटत राहायचे की आपापल्या पूर्वसुरी कार्यकर्त्यांच्या मानाने आपण काहीच काम करत नाही. शिवाय त्यांना असे वाटत राहायचे की, राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृती समाजसेवकांनी स्वातंत्र्याचे जे स्वप्न पाहिले होते, स्वराज्याची त्यांनी जी कल्पना केली होती ती साकार करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी केले नाही तर कोण करणार? अशी सेवापरायण व प्रसिद्धीपराङ्मुख अहमहमिका त्यांच्यात होती. स्वातंत्र्योत्तर काळात दलित, वंचित, स्त्रिया, मुले, आदिवासी यांचा विकास झाल्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही अशी त्यांची पक्की धारण होती. त्यांनी ज्या संस्था उभारल्या, स्थापल्या, विकसित केल्या त्यामागे समाजहितापलीकडे ध्येय व उद्दिष्ट नव्हते. विशेषतः सन १९५० ते २००० हा काळ समाजसुधारिणांचाच होता.
 प्रिन्सिपॉल दाभोळकरांचे कार्यक्षेत्र चतुरस्त्र होते. शिक्षण, सेवा, धर्म, कल्याण यापलीकडे माणुसकीचा धर्म त्यांनी रुजवला. शां. कृ. पंत वालावलकर तर खरेच ‘करुणाकल्पतरू' होते. त्यांनी कष्टाने करोडो रुपये मिळवले व महात्मा गांधींच्या विश्वस्त वृत्तीने सर्वस्व समाजाला दान केले.