त्यानंतरच्या १९७५ पर्यंतच्या पस्तीस वर्षांत कोणत्याही मोठ्या साहित्य उपक्रमाचे अध्यक्षपदी वि.स.खांडेकरांकडे असणार हे ठरूनच गेलेलं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,भा.रा.तांबे,केशवसुत यांची जन्मशताब्दी, नटवर्य केशवराव दाते सन्मान असे कितीतरी उपक्रम वि.स. खांडेकरांच्या नेतृत्वाने व सक्रिय सहभागाने पार पडले. निधी संकलन, स्मारक ग्रंथ संपादन,अध्यक्षीय भाषण इ.तून वि. स. खांडेकरांचं साहित्यिक मन, समाजाचं अनभिषिक्त सम्राटपण सिद्ध होत गेलं व मान्यता पावलं.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींकडे सन १९२० च्या दरम्यान आलं. याच वेळी वि. स. खांडेकर यांनी लेखक म्हणून प्रवेश केला. भारतीय राजकारणाच्या गांधी युगाचा काळ हा वि. स. खांडेकरांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्व विकसित होण्याचा काळ होता ज्याला स्थूल मानाने टिळक युगानंतरचा स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणता येईल. या काळात १२ कादंब-या, २० कथासंग्रह, ७ लघुनिबंध संग्रह, २ रूपककथा संग्रह, ५ लेखसंग्रह, १ व्यक्ती व वाङ्मय, १ चरित्र, १५ पटकथा असं विपुल लेखन करून ते मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक म्हणून समाजमान्य होते. १९३७ साली त्यांच्या 'छाया' बोलपटाच्या कथेस कल्पकता चित्रपट पत्रकार संघांचं ‘गोहर सुवर्णपदक' लाभलं होतं. भारतातील चित्रपट सृष्टीचा पहिला पुरस्कार म्हणून त्याचं असाधारण नि ऐतिहासिक महत्त्व असलं, त्यांना साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं चालून आली असली तरी त्यांच्या साहित्यकृतीस स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण होईपर्यंत मात्र नामांकित असे पुरस्कार लाभले नव्हते. नाही म्हणायला कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्या पत्नी रमाबाई आपटे यांनी आपल्या पतीच्या स्मरणार्थ ठेवलेले कै. ह. ना. आपटे पारितोषिक -१९४२' वि. स. खांडेकरांना त्यांच्या क्रौंचवध' कादंबरीस मिळाले होते. ते पारितोषिक स्वीकारावे म्हणून रमाबाईंनी लिहिलेले २६ मे, १९४३ चे पत्र मोठे हृद्य होते. ते त्यांच्या आनंदाश्रमातून लिहिले गेले होते.
सन १९६० ला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शासनातर्फे उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली व वि. स. खांडेकरांच्या ‘ययाति' कादंबरीस तो दिला गेला. ययाति' कादंबरी मराठी साहित्याची अभिजात साहित्यकृती म्हणून तिला साहित्य अकादमी (१९६०) व भारतीय ज्ञानपीठ (१९७४) असे पुरस्कार लाभले.