पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/71

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


(अविनाश खांडेकर शिवराज्य (खांडेकर विशेषांक) पृ. ४५) सकाळ, संध्याकाळ फिरण्याचा खांडेकरांना छंद होता. फिरायला जाताना कोणीतरी नेहमी त्यांच्याबरोबर असायचे. दत्ताराम घाटे, कवी यशवंत, बा. भ. बोरकर, कवी गिरीश, नाटककार वसंत कानेटकर, प्रभृती मित्र, साहित्यकारांचं घरी येणं, जाणं राहणं असायचं.
 टपाल वाचणं, उत्तर लिहिण्याचा त्यांचा छंद होता. येणा-या टपालाला उत्तर देण्याचा त्यांचा प्रघात व कटाक्ष होता. सामाजिक भावनेनं विद्यार्थी, संस्था, उपक्रमानं ते मदत करीत. त्यांच्याकडे वाचक, स्नेही, आप्त मार्गदर्शनासाठी येत. वेळ, प्रकृतीचीही तमा न बाळगता खांडेकर सर्वांशी हितगुज करीत. लहान-मोठा, आप-पर असा भेद ते बाळगत नसत. माणूसप्रेमी, समाजशील गृहस्थ खांडेकर सुहृदय होते.

 बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषा व साहित्याचे केंद्र म्हणून बडोद्याचे महत्त्व प्रारंभापासूनच राहिले आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या राजाश्रयाचे ते फळ होय. सन १९३८ च्या २५ डिसेंबरला म्हणजे नाताळात तेथील मराठी साहित्य संमेलनाचे १९ वे अधिवेशन योजले होते. त्या वेळी वेगवेगळ्या साहित्य प्रकारांना वाहिलेली शाखा संमेलने घेण्याचा प्रघात होता. या संमेलनात पां. वा. काणे (भाषा), महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार (इतिहास), माधव ज्युलियन (काव्य) इ. बरोबर वि. स. खांडेकरांची कथा संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्या वेळी वि. स. खांडेकर होते अवघे ३६ वर्षांचे. त्यांच्या अनेक कथा नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. शिवाय ‘नवमल्लिका' ‘दत्तक आणि इतर कथा 'जीवन कला’, 'ऊन पाऊस' सारखे कथासंग्रह प्रकाशित झाले होते. वाचकांची त्या कथांना, भाषा व शैलीच्या नव्यापणाला मोठी पसंती लाभली होती. ही निवड त्याचीच पोचपावती होती. या निवडीने वि. स. खांडेकरांना साहित्य वर्तुळात मान्यताप्राप्त साहित्यिक म्हणून सन्मान लाभला, तेथून सन्मानाची शृंखला आजीवन सुरूच राहिली. त्यानंतर गोमंतक साहित्य संमेलन, मडगाव (१९३५), शारदोपासक साहित्य संमेलन, पुणे (१९३५), मुंबई व उपनगर साहित्य संमेलन, दादर (१९३५), सोलापूर प्रांतिक साहित्य संमेलन (१९३६), दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन, जमखंडी (१९४०) अशी एकापाठोपाठ एक अध्यक्षपदे त्यांना मिळत राहिली. सन १९४१ ला तर महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा (आजचे अ. भा. साहित्य संमेलन) रौप्य महोत्सवी अधिवेशनाचा अध्यक्षपदाचा बहुमान मिळून चाळिशीतच ते मराठी साहित्य, संस्कृती, भाषेचे अग्रणी नेते बनले.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/७०