मराठी भाषा व साहित्यास पहिले ज्ञानपीठ मिळवून देण्याचे कर्तृत्व वि. स. खांडेकरांचेच. 'ययाति' कादंबरी आजही मराठी वाचकांची वरची पसंती म्हणून ध्रुवपद टिकवून आहे.
वि. स. खांडेकरांनी मराठीत चतुरस्त्र लेखन केलं. साहित्य व चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगल गुजराती, कन्नड, मल्याळम् आदी भाषांत अनुवादित झाले. काही साहित्य कृती रशियनसारख्या भाषेतही गेल्या. यामुळे वि. स. खांडेकर केवळ मराठी साहित्यिक न राहता ते भारतीय साहित्यिक झाले. भारतीय ज्ञानपीठ पारितोषिकाने त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी भारत सरकारने सन १९६८ मध्ये त्यांना पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. त्याच वर्षी साहित्य अकादमीने साहित्यिक योगदानाची नोंद घेऊन 'महदत्तर सदस्यत्व' (फेलोशिप) बहाल केले. या विविध पुरस्कारांच्या निमित्ताने भारतभर त्यांचे सत्कार सन्मान झाले. षष्ठ्यब्दी गौरव, अमृत महोत्सव झाले. अनके विशेषांक, गौरव अंक प्रकाशित झाले. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरने डी. लिट. पदवी प्रदान केली. (१९७६) जन्मशताब्दी वर्षात भारत सरकारने सन १९९८ मध्ये त्यांचे स्मृती तिकीट प्रकाशित केले. सन १९७५ च्या नागपूर येथे संपन्न पहिल्या विश्वहिंदी संमेलनात भारतीय श्रेष्ठ साहित्यिक म्हणनू सत्कार करण्यात आला. या नि अशा अनेक घटनांतून वि. स. खांडेकरांचं साहित्यिक श्रेष्ठत्व राजमान्य, लोकमान्य झालं.
वि. स. खांडेकर बालपणापासूनच कृश होते. सतत ताप इ. विकाराने ग्रस्त असत. दृष्टी अधू असल्याने बालपणीच चष्मा लागलेला. तरुणपणी हिवतापाने ग्रस्त झाल्याने दीर्घकाळ उपचारासाठी व विश्रांतीस बांबुळीला दत्तक बहिणी वारणाआक्का बरोबर रहावे लागले होते. पुढे शिरोड्यात शिक्षक असताना सर्पदंशाने बेजार झाले होते. रक्तदाबाचा विकारही होता. त्यांच्या पत्रव्यवहारात, लेखात, मुलाखतीत, प्रस्तावनात त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचे उल्लेख सर्वत्र आढळतात. शिवाय पत्नी व मुलांचे आजारपण होतेच. या सर्व अडथळ्यांची शर्यत पार करत वि. स. खांडेकरांनी आपले वाचन, चिंतन, मनन, लेखन, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्य यात सातत्य ठेवले. ते त्यांनी ज्या अविचलपणे केले त्यांतून ‘शब्दचि आमच्या जीवाचे जीवन। शब्दे वाटू धन जनलोकां।' हा तुकारामांचा वस्तुपाठ त्यांचा आचारधर्मच होता हे प्रत्ययास येते.
सन १९७१ संपत आले तसे उजव्या डोळ्याने जे वाचता यायचे ते ही येईनासे झाले. वृद्धत्व आणि अशक्तपणामुळे मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे धोक्याचे होते, पण वाचनच प्राणवायू असलेल्या खांडेकरांना शस्त्रक्रियेशिवाय शवाय पयार्य नव्हता. मागच्या ऑपरेशनचा अनुभव काही चांगला नव्हता.