पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/70

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


गेल्यांचं स्वागत हे त्यांच्या समाजशील स्वभावातच होतं. जे घरी तेच दारी. मित्रांना सदैव मदत करीत.
 मित्रही त्यांना मदत करायचे. विद्यार्थ्यांवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांचा मनुष्य संग्रह मोठा होता. त्यांच्या चेह-यावर व्यथेचं चिन्ह कधी उमटत नाही. बोलण्यात कधी दुःखाचा उद्गार नाही. सगळे सोसायचं. प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेते रहायचं, ही वृत्ती. (डॉ. सुमती क्षेत्रमाडे - गौरविका पृ. ६०) ते सोशिक होते. गृहस्थधर्म पाळणारे होते. इतरांपेक्षा अधिक सहनशील होते. लेखन करताना आपल्या कौटुंबिक जबाबदाच्या टाळल्या असंही त्यांच्याकडून कधी झालं नाही. मुलं, मुली लहान असताना ताप यायचा. खांडेकर सहा-सहा तास मुलींना खांद्यावर घेऊन शतपावली करत, औषधोपचार करत. प्रसंगी लेखन बाजूस सारत. लेखनिकाला सुट्टी देत. पण मुलांच्या संगोपनात कुचराई करत नसत.
 वि. स. खांडेकर उपजत शिक्षक होते. शिरोड्याच्या शाळेत संस्कृत, इंग्रजी, बीजगणित, भूमिती पडेल ते विषय त्यांनी शिकवले होतेच. मुली शिकत असताना मॅट्रिकपर्यंत ते घरी त्यांना संस्कृत, इंग्रजी, बीजगणित शिकण्यास मदत करीत. तीच गोष्ट मुली एम.ए. करतानाही. खाडिलकरांची नाटके खांडेकर त्यांना शिकवीत. मुलींच्या अगोदर बायकोने शिकावे, वाचावे असा त्यांचा प्रयत्न होता. ते पत्नी उषाताईंना सुरुवातीच्या काळात वाचूनही दाखवत. पण त्यांचा ओढा शिक्षणापेक्षा संसाराकडे अधिक होता. त्या स्वयंपाकात सुगरण. राहण्यात टापटीप होत्या. घर नीटनेटकं ठेवण्यात त्या दक्ष होत्या. पत्नीच्या निधनानंतर (२६ ऑक्टोबर १९५८) खांडेकरांनीच मुला-मुलींचा सांभाळ केला. पत्नीबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना सदैव भरलेली असायची.
 त्यांच्या वृद्धापकाळात मोठी मुलगी मंदाकिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. नोकरी सांभाळून वि. स. खांडेकरांचं त्या सारं करीत. लेखनिक, लोकांचं येणं-जाणं, पुढे वि. स. खांडेकरांचं वृद्धत्व, अंधत्व साच्या समर प्रसंगी त्या खांडेकरांच्या मागे खंबीर उभ्या होत्या. पत्नी निवर्तल्यानंतरही त्यांना जे १८-१९ वर्षांचं आयुष्य लाभलं त्या काळात मंदाताईच त्यांच्या पालक होत्या.

 वि. स. खांडेकर आचार, विचारांनी खरे पुरोगामी होते. अन् खरं तर ‘नास्तिक' होते. देवावर त्यांचा विश्वास नव्हता. घरी सत्यनारायणाची पूजा वगैरे कधीही झाली नाही. धार्मिक विधीही होत नसत.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/६९