पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


झाला. मास्टर विनायक, बाबूराव पेंढारकर, लीला चिटणीस, इंदिरा वाडकर, अनंत मराठे यांच्या या बोलपटात भूमिका होत्या. पांडुरंग नाईक यांचे चित्रीकरण होते. आण्णासाहेब माईणकरांचे यास संगीत लाभले होते. हिंदीत डब करून तो प्रकाशित करण्यात आला होता.
 वि. स. खांडेकर १९३६ ते १९६२ पर्यंत चित्रपटांच्या चंदेरी दुनियेत होते. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा भाषांत सुमारे २८ चित्रपटांच्या खांडेकरांनी पटकथा, संवाद, गाणी लिहिली. त्यांच्या पहिल्या चित्रपटास गोहर सुवर्ण पदक तर अंतिम ‘माणसाला पंख असतात'ला भारत व महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला होता. साहित्याप्रमाणेच खांडेकर चित्रपटाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. त्यांना भारतीय साहित्यिक बनवण्यात चित्रपटांचाही मोठा वाटा आहे. आपल्या चित्रपटांतून खांडेकरांनी अनेक सामाजिक समस्यांचे चित्रण केले. तसेच विनोदी कथांचे लिहन मनोरंजनही केले. त्यांच्या अनेक चित्रपट गाण्यांना मोठी पसंती लाभली होती.
 चित्रपट क्षेत्रातील त्यांच्या कार्य, कर्तृत्वाचा विस्तृत आढावा लक्षात घेता एक गोष्ट मात्र निश्चित होते की साहित्याप्रमाणेच त्यांचे चित्रपटही संस्कार, मूल्य, आदर्श, प्रबोधन इ.ची पाठराखण करताना दिसतात.
 अविनाशच्या जन्मानंतर (१९३५) ६ ऑगस्ट, १९३७ ला कन्या मंदाकिनीचा जन्म झाला. तिला बाळलेणं द्यायचं म्हणून वि. स. खांडेकरांनी आपल्याला मिळालेलं गोहर मेडल मोडलं. चित्रपट व शाळा यांची कसरत त्यांना जमेनाशी झाली. कारण चित्रपटाच्या कामासाठी वारंवार कोल्हापूर, पुणे, मुंबई असा प्रवास करणं जिकिरीचं झालं. म्हणून खांडेकर सपरिवार सन १९३८ च्या प्रारंभी कोल्हापूरला आले. त्यांनी शाहूपुरीतील मास्टर विनायकांच्या बंगल्यात आपलं बि-हाड थाटलं. आजचं राजारामपुरीतील कन्येनं बांधलेलं 'नंदादीप' निवासस्थानी कायमचे राहण्यास येण्यापूर्वी खासबाग इथे मूग यांच्या घरी, नंतर राजारामपुरीतील ‘मुक्ताश्रम' येथे ते राहात. या काळात त्यांना कल्पलता (१९३९), सुलभा (१९४१) आणि मंगल। (१९४४) या कन्यारत्नांचा लाभ झाला. खांडेकरांचे आपल्या मुलांवर प्रेम होतं. आपलं लेखन, वक्तृत्व, संपादन, संमेलने, चित्रपट या सर्वांतून वेळ काढून मुलांवर संस्कार करणे, शंका समाधान, गोष्टी सांगणं आवर्जून करत.

 गृहस्थ जीवनाचे संस्कार वि. स. खांडेकरांवर आजोळी असल्यापासूनच होत राहिले. त्यांचे वडील अकाली निवर्तले. त्या काळातही पोरेले खांडेकर आपल्या अर्धागवायू झालेल्या वडिलांची सेवा-शुश्रूषा करीत. आल्या

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/६८