मंगेशराव कुलकर्णी त्यासाठी खूप मेहनत घेत. खांडेकरांचे स्नेही गं. दे. खानोलकर त्या वेळी भारत-गौरवमालेत काम करत. त्यांच्या सांगण्यावरून खांडेकरांनी आपली पहिली कादंबरी ‘हृदयाची हांक' लिहिली व एप्रिल, १९३० मध्ये लगेच ती प्रकाशित झाली. एव्हाना वि. स. खांडेकर बहुप्रसव साहित्यिक म्हणून वाङ्मय वर्तुळात सर्वपरिचित झाले होते. तत्कालीन नियतकालिकात ते नियमित लिहीत. या काळात त्यांनी ३ लेख, ५ कविता, ११ परीक्षणे, १९ कथा, ३ लघुनिबंध लिहिले. शिरोड्यातील निसर्ग व खेड्यातील निवांत जीवन हे त्याचं कारण होतं. सन १९३१ मध्ये ‘कांचनमृग' कादंबरी नंतर लगेचच त्यांचे ‘गडकरी : व्यक्ती व वाङ्मय' प्रकाशित झाले. सन १९३२ मध्ये त्यांनी ‘आगरकर चरित्र' वाचकांच्या हाती आले. नंतर ‘उल्का (१९३४), दोन ध्रुव (१९३४) या कादंबच्या व ‘दत्तक व इतर गोष्टी (१९३४) चे प्रकाशन झाले.
यामुळे वि. स. खांडेकर मान्यताप्राप्त साहित्यिक बनले. बडोद्याच्या साहित्य संमेलनात कथा विभागाचे अध्यक्षपद त्यांना लाभलं. पुढे सन १९३५ ला तर ते पहिल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पाठोपाठ त्यांना पुण्याच्या शारदोपासक संमेलनाच्या चौथ्या अधिवेशनचे अध्यक्षपद मिळाले. नंतर ते मुंबई मराठी साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष झाले. त्यांचे विचार व मते यांना एक प्रकारची मान्यता लाभून ते मराठी साहित्यरसिकांचे प्रिय लेखक, वक्ते, विचारक, समीक्षक, कथाकार, कादंबरीकार म्हणनू सन्मानित झाले. त्यांच्या साहित्य विचारातील गांभीर्य, नवता व भाषेतील सौंदर्य याची विलक्षण मोहिनी मराठी भाषा व साहित्यात निर्माण झाली होती. मराठी वाचक 'वि. स. खांडेकर' शीर्षक दिसताच प्रथम पसंतीने त्यांना वाचू लागला.
२० जानेवारी, १९३६ ला वि. स. खांडेकरांचे घरी पुत्ररत्न आले. सर्वत्र आनंदीआनंद होता. वि. स. खांडेकर यांनी मुलाचे नाव अविनाश ठेवून जीवनावरची दुर्दम्य आस्थाच व्यक्त केली होती. तशातच मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांनी खांडेकरांना चित्रपटासाठी पटकथा लिहिण्याचे आमंत्रण दिल्याने अनपेक्षितपणे त्यांच्यापुढे साहित्याचे नवे दालन व माध्यम खुले झाले. प्रथम हे काम त्यांना आपल्या आवाक्याबाहेरचे वाटत होते. पण मग आग्रहामुळे त्यांनी प्रयत्न करायचे ठरवून 'छाया' ही पटकथा 'हंस'ला दिली व ती निर्माता व दिग्दर्शकांच्या पसंतीला उतरल्याने लगेचच मुहूर्त करून चित्रीकरण सुरू झाले. सहा महिन्यात चित्रपट तयार होऊन तो २० जून,१९३६ रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित