सांगलीला ‘संगीत रंकाचे राज्य' नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर वि. स. खांडेकर आपल्या आजोळीच मे महिन्याच्या सुट्टीसाठी होते. या काळात सदर नाटकाच्या प्रकाशनाचा योग जुळून आल्याने त्यांनी तिथेच बसून दि. २६ मे, १९२८ ला नाटकासंबंधी आपली भूमिका “राज्याचा इतिहास शीर्षकाने लिहिली. बा. अ. भिडे यांची प्रस्तावना वि. स. खांडेकरांनी अगोदरच घेऊन ठेवली होती. (२२ मार्च, १९२८) नाटक मार्गी लागल्याने खांडेकरांची प्रकृती सुधारू लागली होती. दत्तक बहिणीने लग्नाचे टुमणे लावल्याने व वयाने तिशी गाठल्याने लग्न करण्यास खांडेकरांनी तत्त्वतः तयारी दर्शविली तरी लग्नास होणा-या हजार-पंधराशे रुपयांच्या खर्चाची विवंचना होती. स्नेही दत्ताराम घाटे यांच्या भरवशावर हातउसने घेऊन लग्न करण्याचे ठरले.
घरी पत्नी म्हणून येणाऱ्या वधूबद्दल खांडेकरांची स्वतःची अशी धारणा होती. फार शिकलेली नसली तरी चालले पण आपण ज्या कोकणात खेड्यात राहतो तिथे आपल्यासारख्या शिक्षकाचा ओढग्रस्तीचा संसार सांभाळणारी असावी. याच होत्याने त्यांनी अन्य स्थळे नाकारून बेळगावखानापूरजवळील आसोग्याच्या मणेरीकरांची कन्या मनूचे स्थळ पसंत केले. मे १९२८ मध्येच आक्का व दत्तक आईच्या संमती व उपस्थितीत वधूपरीक्षा आसोग्याला झाली. १६ जानेवारी, १९२९ रोजी आसोगे मुक्कामीच निवडक पाहुणे व मित्रांच्या उपस्थितीत विवाह पार पडला.
विवाहानंतर पत्नीचे नाव त्यांनी उषा ठेवले ते त्यांच्या संगीतकारांचे राज्य'च्या नायिकेचे होते. मनाची नायिका प्रत्यक्षात मिळाल्याचीच ती साक्ष होती. विवाह साधेपणी, कर्मकांडास फाटा देऊन करण्यात आला. लग्नातील भोजनाच्या वेळी पंक्तीभेद (जातिभेद) होणार नाही याचे आश्वासन घेऊन केलेला हा विवाह म्हणजे खांडेकरांच्या आचार-विचारातील अद्वैत सिद्ध करणारा वस्तुपाठच ठरला. त्यानंतर लग्नविधी आवरल्यावर यथावकाश त्यांनी शिरोड्यास संसार थाटला. तो पाहण्यासाठी (लग्न चुकल्याची चुटपूट दूर करण्याच्या हेतूने) गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर मे, १९३० च्या पहिल्या आठवड्यात शिरोड्यास मुद्दाम आले व शिष्यास आशीर्वाद देऊन गेले.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील सर्वांत मोठे व दीर्घकालीन (१९३० ते १९३४) जनआंदोलन म्हणून मिठाचा सत्याग्रह ओळखला जातो. मिठावरच्या कराचा भार गरिबातील गरीब भारतीयावर पडत असे. लहरी पावसामुळे लाखो शेतकरी कर भरू शकत नसत. करबंदी आंदोलनाचा भाग म्हणून मिठाचा सत्याग्रह करण्यात आला.