त्याची सुरुवात गुजरातमधील दांडी यात्रेने झाली. ६ एप्रिल १९३० ला दांडी येथे कायदाभंग करून मीठ तयार करण्यात आले. त्यात महात्मा गांधींना अटक करण्यात येऊन पुणे येथील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले. त्याच दिवसापासून महाराष्ट्रातही मिठाचा सत्याग्रह विलेपार्ले (मुंबई) येथे सुरू करण्यात आला. कायदेभंगाची चळवळ महाराष्ट्रात संघटित रितीने व शिस्तीने व्हावी म्हणून महाराष्ट्र कायदेभंग मंडळ स्थापन करण्यात आले. त्या मंडळातर्फे शिरोडे येथे १२ एप्रिल ते १५ एप्रिल, १९३० या कालावधीत राज्यस्तरीय मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. त्याचे नेतृत्व मामासाहेब देवगिरीकर व धर्मानंद कोसंबी यांच्याकडे होते. शिरोडे गाव गोवा व महाराष्ट्राची सरहद्द असल्याने व तिथे मिठागरे असल्याने शिरोड्याची निवड करण्यात आली. गोव्यात तेरेखोल येथे पोर्तुगिजांविरुद्ध तर महाराष्ट्रात शिरोडे येथे ब्रिटिशांविरुद्ध सत्याग्रह करण्यात आला. ५०० जणांनी त्यात भाग घेतला. ३००जणांना अटक करण्यात आली. उरलेले जखमी होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
वि. स. खांडेकर या सत्याग्रहात सक्रिय सहभागी होते. त्यांचे सहकारी आप्पा नाबर यांचेच मिठागर सत्याग्रहासाठी निवडण्यात आले होते. त्यांचे दुसरे एक सहकारी व 'वैनतेय'चे संपादक मेघश्याम शिरोडकर या सत्याग्रहात सामील होते. वि. स. खांडेकरही यात सामील होणार होते पण सरकारी मदत घेणाच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांच्यावर बंधन होते. परंतु स्वयंसेवक, व्यवस्थापन इ.मध्ये ते सक्रिय होते. आप्पा नाबरच्या घरावर अटकेनंतर जप्ती आली होती. आपल्या हृदयाची हाक' कादंबरीच्या मानधनाची रक्कम देऊन खांडेकरांनी आप्पा नाबरांचे घर वाचवले. 'वैनतेय'मध्ये सत्याग्रहाची बातमीपत्रे खांडेकरांनी लिहिली. सभांत त्यांनी भाषणे केली. सत्याग्रहात भाग घेऊन शकल्याचे शल्य जीवनभर गांधीवादी विचार आचाराचा वसा जपून खांडेकरांनी भरून काढले. गांधी जन्मशताब्दीस खांडेकरांनी विपुल लेखन केलं. त्याचे संकलन ‘दुसरे प्रॉमिथिअसः' ‘महात्मा गांधी' या नावाने प्रकाशित झाले आहे.
वि. स. खांडेकरांनी सन १९३० ते १९३५ या कालखंडात केवळ विपुल लेखन केले असे नाही तर जे लेखन केले ते विविधांगी पण होते. ‘संगीत रंकाचे राज्य' सन १९२८ ला प्रकाशित झाल्यावर लगेच १९२९ मध्ये नवमल्लिका' हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. दरम्यान खांडेकरांना वक्ते म्हणून ही आमंत्रित केले जाऊ लागले होते. त्या काळी ‘भारत-गौरव माला' वाचकांच्या पसंतीस उतरली होती.