इथंही डी. टी. मालक, भुजंगराव शेळके, आणि येथील शिक्षकवृंद आमच्याशी अतिरिक्त स्नेहानेच वागत. रिमांड होममध्ये प्रिन्सिपॉल शं. गो. दाभोळकर, प्राचार्य सी. रा. तावडे, प्रा. एन. जी. शिंदे, प्रा. डी. एम. चव्हाण ही शिक्षक मंडळी; शां. कृ. पंत वालावलकर, नानासाहेब गद्रे ही समाजशील सहाय्यक मंडळी आम्हाला आमची वाटत ती आयुष्यातील अनाथपणाची पोकळी भरून काढण्याच्या त्यांच्या सहजशील प्रेमळ वृत्तीमुळे. त्यातून माझ्यात दोन स्वप्नं साकारली. पूर्वीच्या समाजसेवकाच्या स्वप्नास शिक्षक होण्याची जोड मिळाली. आपणही मोठं होऊन शिक्षक बनून समाजसेवा करावी, असं सुप्तपणे अंकुरत गेलं.
मी सातवी पास होऊन नव्यानेच स्थापन झालेल्या आंतरभारती विद्यालयात आलो. इथं असाधारण प्रेमळ शिक्षक व संस्थाचालक होते. ते ध्येयवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसेवा दल यावर विश्वास ठेवणारे होते. साधना साप्ताहिक, साने गुरुजी, समाजवादी विचार इ.ची इथं नुसती ओळखच नाही झाली तर संस्कार पेरणीही झाली. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, बाबा आमटे, आचार्य विनोबा भावे, वि. स. खांडेकर, ग. प्र. प्रधान, यदुनाथ थत्ते, प्रा. नरहर कुरूदकर अशा अनेकांचा सहवास इथे लाभला. त्यांची भाषणे, संपर्क, संवाद यातून माझं किशोरपण फुललं. मी भाषणं करू लागलो तो इथेच. पहिली कविता लिहिली ती इथेच.
पुढे मी गारगोटीच्या श्री मौनी विद्यापीठात गेलो. तिथे प्रशिक्षित पदवीधर, शिक्षक झालो. इथं प्रत्यक्ष सहवास संपर्क लाभला नाही तरी जे. पी. नाईक, डॉ. चित्रा नाईक, आचार्य भागवत प्रभृतींच्या ध्येयवादी कर्तृत्वाचा ठसा मजवर उमटला. मी माझ्या पायावर शिक्षक म्हणून उभारलो अन् मला समाजाचे मातीचे पाय, खायचे दात दिसू लागले. मला माझे हात, पाय, डोकं, हृदय मिळण्याचा हा काळ होता. मी बनून तयार होतो. मला आता ‘कथनी' आणि 'करणी' मधील अंतर उमगलं होतं. त्यामुळे समाजसेवा करण्याची तीव्रता वाढली. प्रारंभी मी शिक्षक संघटना बांधली. गरीब विद्यार्थी वसतिगृहे चालविली. पुढे प्राध्यापक संघटनेचे काम केलं. एम.ए., पीएच. डी. झालो. प्राध्यापक झालो. तशी आपल्याचसारख्या अनाथांचं काम करण्याची उर्मी आली. ते कार्य मी वीस वर्षे केलं.
सन १९७० ते २००० या काळात मी अनेकांच्या प्रभावाने व अनेकांच्या सहकार्याने विविध संस्था, संघटना, ट्रस्ट इ.मध्ये काम केलं. या काळात मला ज्यांचं सान्निध्य लाभलं अशांविषयी प्रसंगपरत्वे कृतज्ञता, गौरव, श्रद्धांजली, स्नेह म्हणून लिहीत राहिलो.
पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/6
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.