पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्राप्त काल हा विशाल भूधर

 'कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक' हा मी वेळोवेळी लिहिलेल्या व्यक्तिलेखांचा संग्रह होय. मी १९५९ साली पंढरपूरहून कोल्हापूरला आलो, तेव्हा माझे वय अवघे १० वर्षांचे होते. पंढरपूरच्या वा.बा.नवरंगे बालकाश्रमात माझा जन्म झाला. बालपणही तिथेच गेले. तिसरीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण पंढरपूर नगरपालिकेच्या शाळेत झाले. ती शाळा तेली गल्लीतील तेली मठात भरत असे. चार नंबर शाळा म्हणून तिची ओळख होती. कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये माझी बदली झाली तरी दिवाळी व उन्हाळी सुट्टीत मी पंढरपूरला येत-जात असे. हा क्रम माझे लग्न होईपर्यंत वा नोकरी लागेपर्यंत कायम होता. या उभारीच्या काळातलं पंढरपूरचे समाजजीवन कर्मठ असलं तरी तिथे बबनराव बडवे,बाबूराव जोशी,भाऊसाहेब भादोले, कमळाबाई बडवे , छन्नुसिंग चंदेले इ. तत्कालीन समाजसेवक आमच्या बालकाश्रमातील आम्हा अनाथ, निराधार,परित्यक्त मुले, मुली व महिलांबद्दल सहानुभूती बाळगून असत. ती कोरडी सहानुभूती नसायची. ते वरचेवर यायचे, भेटायचे, शेतावर न्यायचे, प्रेमाने बोलायचे. आम्ही आश्रमातील मुले-मुली शाळेसाठी रस्त्यावरून जात-येत असू तेव्हा परिसरातील मुलं- मुली आम्हास ‘आश्रमातली मुल' म्हणून आमची हेटाळणी करायची. त्या पार्श्वभूमीवर वरील समाजसेवकांबद्दल माझ्या बालमनात आपुलकी असायची व नकळत आपण असं काम करावं, असं वाटून जायचं.
 मी कोल्हापूरला आलो. इथे मी आर्य समाजाच्या शाहू दयानंद मोफत मराठी शाळेत शिकू लागलो. इथं शाळेत येता-जाता परिसरातील मुलं रिमांड होमची मुलं म्हणून आम्हाला हेटाळायची. या सर्वांतून आपण समाजातल्या इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत, हे आम्हाला समजत गेलं.