नानासारख्या ब्राह्मण जातीच्या माणसाने असा लौकिक मिळवणं यामध्ये नानांचा जसा मोठेपणा आहे, तसा कोल्हापूरचा देखील उदारपणा आहे. नानांनी आपल्या आयुष्यामध्ये जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सतत मनुष्य धर्म पाळला. असा मनुष्यव्यवहार आता अत्यंत दुर्मीळ झालेला आहे. आज आपण सगळ्यांनी अठरा वर्षांनंतर नानांना अशासाठी आठवत राहिलं पाहिजे की, नानांच्या रूपाने त्यांच्या जीवन आणि कार्याच्या रूपातून जे सद्गुण आपल्याला दिसून येतात, त्या सद्गुणांचे उदात्तीकरण, त्या सद्गुणांचा भूमितीच्या पटीने आपल्यात विकास होण्याची आज गरज आहे. नानांचं सगळं जीवन बघत असताना मला जे दिसतं ते हे|
नाना गुणांचा गुणाकार करायचे आणि दोषांचा भागाकार करायचे. अगदी एका वाक्यात नाना कसे होते? असं जर कुणी मला विचारलं तर मी सांगेन नानांच्या व्यक्तिमत्वामध्ये गुणांचा गुणाकार करायचा मोठा गुण होता. उदार वृत्ती ज्याला आम्ही हिंदीमध्ये, कद्रदानी म्हणतो ती नानांच्यामध्ये होती. कार्यकत्र्यांचं मोहाळे त्योच्या मागं असायचं. एखादा वाईट मनुष्य असेल तर त्याचा दोष मागे टाकायचा आणि दोष वजा करून माणसाला स्वीकारण्याचा एक फार मोठा उमदेपणा नानांच्यामध्ये होता. नानांचं सगळं जीवन राजकारणमुक्त व समाजकारणयुक्त होतं. ते सतत माणुसकीला साद घालणारं होतं. एकविसाव्या शतकाची मागणीच मुळी सद्गुण राहणार असल्याने अशा निष्काम कर्मयोग्याच्या जीवन व कार्याची स्मृती आपण जपायला हवी.