पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दिला शेअर.' म्हणजे माणसाची ऐपत, माणसांची क्रेडिट जगामध्ये कशी असते पहा. मी त्या आंतरभारतीमध्ये होतो म्हणून मला शेअर्स मिळाला. नानांची माणसांची पारख करण्याची आपली अशी पद्धत होती. पुढे याच जनता बँकेने मला नंतरच्या काळामध्ये कसलंही क्रेडिट नसताना चांगलं एक लाख रुपयांचे कर्ज दिलं. माझं पहिलं कर्ज पाचशे रुपये आणि शेवटचं कर्ज एक लाख रुपये. मला तो प्रसंग अजूनही आठवतो. मी जागा विकत घेत असताना नानांच्याकडे गेलो आणि म्हटलं की मला पन्नास हजार रुपये कर्ज पाहिजे. नाना म्हणाले, 'तुझ्याकडे ठेवायला काय आहे,' मला त्या वेळी कळालं की ठेवायला कायतरी लागतं (म्हणजे दागिने, जमीन जुमला, सातबारा, प्रॉपर्टी कार्ड) मी असा फाटका मनुष्य. तुम्हाला खरं वाटणार नाही. नानांनी त्या वेळी श्री. शिंदे म्हणून मॅनेजर होते. त्यांना सांगितलं की, ‘मी सही करतोय, माझंच जामीन म्हणून नाव टाका याला.' आणि नानांनी मला जागा घेण्यासाठी त्या काळात पन्नास हजार रुपये दिले. म्हणून मी या कोल्हापुरामध्ये अनाथाचा सनाथ झालो. असा एक मोठा मनुष्य मला भेटला आणि त्यामुळे या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल बोलण्याचा सार्थ गौरव मला प्राप्त होतो आहे, याचा मला मोठा अभिमान वाटतो.
 त्या वेळी रत्नाप्पा आण्णांची एक संस्था होती. तिचं कॉमर्स कॉलेज इथं चालू होतं ते लॉ कॉलेजही चालवायचे. तिथे रत्नाप्पा आण्णांनी कोल्हापुरातील दोन माणसं त्यांच्या ट्रस्टवर-कौन्सिल ऑफ एज्युकेशनमध्ये निवडली होती. शं. गो. दाभोळकर वारल्यानंतरची ही गोष्ट. त्यामध्ये एक बापू होते आणि दुसरे नाना. याच रहस्य असं होतं की त्या काळामध्ये आण्णांना अशी माणसं पाहिजे होती की जी सत्तापिपासू असणार नाहीत, प्रामाणिक असतील आणि एका पैशाला देखील शिवणार नाहीत. अशा दोघांच्यामध्ये नानांचा समावेश होता. ही दोन्ही माणसं कोकणातून आलेली आणि सचोटी पाळणारी होती म्हणून आण्णांनी निवडली होती.

 नाना कोणत्याही संस्थेतल्या भांडणात कधी असायचे नाहीत. भांडणं सुरू झालं की नानांची एक ठरलेली पद्धत मला चांगली आठवते. वादावादी सुरू झाली की, ते म्हणायचे, ‘मी निघालो, मला वळे झाला आहे. त्याचा अर्थ असा असायचा की तुमचं तुम्ही भांडत बसा, माझा मी निघालो. कुणाच्या भांडणात ते पडायचे नाहीत. भांडण विकोपाला गेले की ते नानांच्याकडे जायचं. बाबूराव धारवाडे यांनी एक छान आठवण त्या काळामध्ये सांगितली होती. त्यातून सिद्ध होते की मनुष्य म्हणून नाना किती मोठे होते! त्या काळामध्ये बाबूराव धारवाडे हे ‘जनसारथी' चालवत होते.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/४४