Jump to content

पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निवडणुका लागल्या की मतदान ठरलेलं असायच. त्यामध्ये सगळ्यात जास्त मत घेऊन निवडून येणारे नानाच असायचे. लाके फक्त म्हणायचे की ‘किती लीड' घेतलं नानांनी? नाना निवडून येणार हे ठरलेलंच असायचं. त्या काळामध्ये जनता बँकेचे सगळे संचालक प्रचाराला जेव्हा जायचे तेव्हा नानांना घेतल्याशिवाय ते कधीच बाहेर पडायचे नाहीत. नाना ही त्या सगळ्या लोकांची अशी एक ढाल होती की, त्यांच्या नावाने कोल्हापुरात जोगवा मागितला की कधीही आपली झोळी रिकामी राहणार नाही, असा एक प्रचर्ड विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. जनता बँकेच्या रौप्यमहोत्सवाच्या काळामध्ये मी जनता बँकेशी संबंधित होतो. त्या काळामध्ये नानांनी जनता बँकेला असं सांगितलं की, आपला रौप्यमहोत्सव आहे ना? आपण काही पैसे एकत्र करू आणि ट्रस्ट करू. त्या ट्रस्टवर कोल्हापुरातल्या काही लोकांना घेतलेलं होतं. त्या सगळ्या लोकांत मीच लहान मनुष्य होतो आणि माझं नाव नानांनी आणि आर. जे. शहांनी सुचवल्याचं मला आठवतं. नानांना माणसांची चांगली पारख होती. कुणाकडून काय काम करून घ्यावं हे नानांना पुरेपूर माहीत असायचं.

 जनता बँकेशी माझा संबंध निर्माण झाला त्या काळातील एक आठवण सांगण्यासारखी आहे. मी कोल्हापुरात आलो त्या वेळी माझी कोल्हापुरात अजिबात ओळख नव्हती. मी इथल्या आंतरभारतीमध्ये साधा शिक्षक होतो आणि मला सायकल घ्यायची होती. त्याकाळामध्ये शिक्षकांना चारशे ऐंशी पगार असायचा. प्रत्यक्षात मात्र ऐंशी रुपयचे दिले जायचे आणि चारशे रुपयांवर सही घेतली जायची. त्याचा एक मोठा इतिहास आहे. ऐंशी रुपयामध्ये मी शिकवत होतो. सायकलची किंमत पाचशे रुपये होती. त्या काळामध्ये सगळ्यात कमी शेअर्सची किंमत असलेली बँक-जनता बँकच होती. मला असा शोध लागला की पंचवीस रुपयांचा शेअर जर मिळवला तर पाचशे रुपये कर्ज मिळतं. माझ्या आयुष्यातलं पहिलं कर्ज मी जनता बँकेचं काढलं आणि ते पाचशे रुपये होतं. मला असं कळालं होतं की, बाकीचे संचालक ओळखी-पाळखीच्या लोकांना शेअर्स देतात. मी म्हटलं, बघूया तरी परीक्षा घेऊन आणि मी त्यांच्या स्टेशन रोडवरच्या दुकानात गेलो. संध्याकाळी पाच-सहाची वेळ. नानांची दुकानात भेटायची वेळ. मी गेलो आणि सांगितलं की 'मी आंतरभारतीमध्ये शिक्षक आहे. मला सायकल खरेदी करायची आहे. पाचशे रुपयांचे कर्ज पाहिजे तुम्ही मला ते द्या.' ते म्हणाले, “अरे, आधी शेअर घ्यायला लागतो, आधी कर्ज नाही मिळत!' पुढे म्हणाले, “कुठल्या शाळेमध्ये? आंतरभारती म्हणजे खांडेकरांची का? तुला

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/४३