नाना संगमेश्वर सोडून कोल्हापूरला आले ते या मित्रांना घेऊन. मग इथे ही त्यांनी अशाच प्रकारचे काम सुरू केलं. कोकणानं या कोल्हापुरला अनेक माणसं दिली. वि.स.खांडेकर देखील कोकणानं कोल्हापूरला दिलेली देणगी आहे. कोल्हापूरमध्ये चित्रपटसृष्टी निर्माण झाली नसती तर वि. स. खांडेकर कदाचित शिरोडा सोडून कोकण सोडून,कोल्हापूरला आले नसते.
कोल्हापुरात असा एक काळ होता की, नाना एखाद्या सार्वजनिक संस्थेवर नाहीत अशी एकही संस्था सापडणे कठीण.मी अगदी नाव घेऊन तुम्हाला सांगेन की इथल्या रोटरी क्लबच्या स्थापनेच्या काळात नाना हे अत्यंत अभिमानाने आणि आदराने, आमंत्रित केलेले सन्मानित असे सभासद म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. अलीकडच्या काळामध्ये रोटरीच्या संदर्भामध्ये एक उदाहरण असं सांगितलं जातं. जे आर.डी.टाटा त्यांच्या पूर्वायुष्यात दर बुधवारी पाच वाजता ते जगातल्या कुठल्यातरी रोटरी क्लबमध्ये असायचे. नाना कोल्हापुरात आहते आणि बुधवारी रोटरी क्लबमध्ये नाहीत, असं कधी झालं नाही. रोटरी क्लबमध्ये असलेल्या मंडळींना माहीत आहे की, त्यांच्या उपस्थितीत ‘परसेंटेज' असतं. त्यांच्याबरोबर काही काळ रोटरी क्लबमध्ये एकत्र काम केल्याचे मला आठवते. नाना अत्यंत नियमाने रोटरी क्लबमध्ये जायचे. त्यांच्यामध्ये वक्तशीरपणा होता. कोणत्याही सभेला नाना वेळेवर हजर! कोणत्याही समारंभाला वेळेवर हजर! माझ्या दृष्टीने त्यांच्यावर गांधीवादाचा फार मोठा पगडा असल्याशिवाय हे शक्य नाही. गांधीजींची एक आठवण अशी सांगितली जाते की, गांधीजींनी एक गृहस्थांना वेळ दिलेली होती आणि ते गृहस्थ वेळेवर आले नाहीत. गांधीजींनी आपलं काम सुरू केलं आणि पाच मिनिटांत ते गृहस्थ आले आणि चाचरत गांधीजींना म्हणाले की, ‘क्षमा करा, मला पाच मिनिटे वेळ झालेला आहे. यावर गांधीजी म्हणाले, 'आता तुम्हाला पाच तास थांबायला लागेल. कारण पुढचे तुमच्या वेळेनंतरचे पाच तासाचे माझे कार्यक्रम ठरलेले आहते. आणि त्या गृहस्थांना गांधीजींनी शिक्षा म्हणून पाच तास थांबायला लावलं होतं. नानांनी गांधीजींसारखी कुणाला शिक्षा दिली नाही. उलट ‘आधी केले आणि मग सांगितले' असा एक वस्तुपाठ आपल्या सगळ्या चरित्रातून कोल्हापूरमध्ये निर्माण केला.
रोटरी क्लबबरोबरच नानांनी कोल्हापूर जनता बँकेची मुहर्तमेढ रोवली. या कोल्हापूर जनता बँकेचा लौकिक असा की, नाना अगदी स्थापनेपासून मृत्यूपर्यंत या बँकेचे संचालक होते. काही काळ अध्यक्ष पण होते. त्या काळामध्ये असा एक रिवाज असायचा. निवडणुकीत पॅनल असायचं.