पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवसायामध्ये आले. अनेक प्रकारचे उद्योग केले. त्यांनी हे सगळं करत असताना त्यांनी कधी 'तुकारामाचं दुकान चालवलं नाही. याचा अर्थ कोणताही धंदा आतबट्यात येईल असा चालवला नाही. धंद्यातील उतारचढीचं पहायचं आणि मग काय ते ठरवायचं.
 नानांना व्यापाराची भविष्यलक्ष्यी दृष्टी होती. तशी ती त्याच्या समाजकारणात देखील होती. त्या काळामध्ये देवरूख, रत्नागिरीची अनेक मंडळी नानांना लकडा लावायची की तुम्ही आमच्या पक्षात या आणि निवडणूक लढवा. तुम्ही निवडून याल अशी आमची खात्री आहे. कारण त्या वेळी कोकणातलं असं कोणतंही गाव नव्हतं की, ज्या गावामध्ये गद्यांची बिछाईत नव्हती. ‘बिछाईत' याचा अर्थ त्यांची उधारी आणि व्यापार चालत नाही असं एकही गाव त्या काळामध्ये नव्हतं. गद्रे परिवार हा देवरूख आणि त्या परिसरामध्ये घरोघरी गेलेला परिवार होता. देवरूखमधील त्यांच्या दुकानात आजही तुम्ही कधी जाल तर पिढ्यानपिढ्या लोक देवरूखच्या त्यांच्या दुकानामध्ये सगळा सौदा घेताना दिसतील. हे जे ‘गुडविल' आहे व्यापारातलं, ते एका पिढीचं नाही तर पिढ्यान्पिढ्या कुटुंबांनी ते जपलं आहे.
 नानांचं घर म्हणजे मित्रांनो व्यापाराचं एक विद्यापीठच होतं. मला गद्रे कुटुबांमधील अनके मुलं, पुतणे, त्यांचे भाऊ असे माहीत आहते की त्यांनी प्रत्येकाला दुकान काढून दिलेलं आहे. कुणाला चिपळूणमध्ये दुकान काढून दिलं, कुणाला कराडमध्ये; कुणाला मुंबईमध्ये तर कुणाला कलकत्त्याला.
 आपला काका, पुतण्या, भाऊ घ्यायचा, त्याला व्यापाराचे प्राथमिक पाठ द्यायचे आणि त्याला स्वतत्रं करायच. विसाव्या शतकात आपली सगळी घरं मोडली, दुभंगली. नानांचं घर कधी दुभंगलेले तुम्हाला दिसणार नाही. कारण त्यांच्या घरामध्ये संयुक्त परिवाराची सगळ्यांना सामावून घेण्याची फार मोठी समावेशक वृत्ती असलेली दिसेल, असे व्यापारामध्ये घट्ट पाय रोवून उभारलेले नाना, त्यांची समाजात देखील तशीच घट्ट पकड होती.

 नानांचं जे समाजकारण आहे हे मुळात देवरूखपासून सुरू झालं. नंतर ते कोल्हापुरात आले. नाना नुसते एकटे कोल्हापुरात आले नाहीत तर त्यांनी आपल्याबरोबर अनके कार्यकर्ते आणले. आता या क्षणी देखील कोल्हापुरात एक गांधी तत्त्व प्रचार केंद्र सुरू आहे. शंकरराव सार्दळ नावाचे गुरुजी हे एक गांधी तत्त्व प्रचार केंद्र चालवायचे. तिथे डॉ. कापडी नावाचे त्यांचे एक स्नेही दवाखाना चालवायचे. नाना त्यांच्या कामाला मदत करायचे.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/४१