पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाना मुंबईला खरेदी करायला जायचे. मुंबईचे सगळे व्यापारी हे मारवाडी किंवा गुजराती असायचे. मराठी माणसावर त्यांचा फार कमी विश्वास असायचा. नानांनीच मला एकदा सांगितलेली गोष्ट आठवते की, ते उधारी आपल्या जातीच्या, आपल्या धर्माच्या लोकांना जास्त द्यायचे. मराठी माणूस आला की त्याला उधारी कमी. अपवाद होता फक्त गद्रयांच्या पेढीचा. नाना आले की मुंबईचे सगळे व्यापारी त्यांना एक पदवी द्यायचे, ‘राजश्री' - ‘राजश्री आले म्हणायचे! राजश्री कशासाठी? राजर्षि नव्हे, राजश्री! राजश्री याचा अर्थ आहे की असा मनुष्य की जो कधी टांग देणार नाही. बाकी सगळे टांगा द्यायचे, उधारी बुडवायचे, वांदा करायचे. वादा एक करायचा आणि एक पाळायचा! नानांच्या पेढीचं वैशिष्ट्य असं होतं नानांनी जो शब्द दिला तो जन्मभर पाळला. त्यांच्या व्यापाराच्या वह्या तुम्ही आजही काढून बघा. पंचेचाळीस दिवसांची उधारी म्हटल्यावर चाळिसाव्या दिवशी ड्राफ्ट गेलाच पाहिजे. मला त्यांचे मित्र बापू वालावलकर हे नेहमी सांगायचे की, मी नानांकडून व्यापाराची सचोटी शिकलो. दोघेही कोकणातलेच. नाना त्यांना नेहमी सांगायचे की, 'बापू व्यापारामध्ये मी अघोरी साहस केलेलं तुम्हाला दिसणार नाही. नानांनी जो सगळा पैसा जमवला तो ‘पांढरा पैसा.' ते कपडेच नुसते पांढरे घालायचे नाहीत. व्यापारामध्येही सचोटी पेढीवर इन्कमटॅक्सची रेड पडली असं तुम्हाला गद्रेपरिवाराच्या इतिहासामध्ये दिसणार नाही. इन्स्पेक्शनला केस काढली जाई पण रेड नाही. ही सचोटी नानांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एका गांधीवादाच्या भक्कम संस्कारावर उभारलेल्या परंपरेमुळे मिळविली.

 नानांचं दुसरं वैशिष्ट्य असं की, ते सतत व्यापार बदलत गेले. तसेच नानांनी व्यापारात नवनव्या खुब्या केल्या? साखर खुली करायला लागल्यानंतर नाना चहाचा व्यापार करू लागले. त्या काळात चहा सुटा मिळायचा. नानांनी त्या काळामध्ये चहाचे पाऊच तयार करून ते विकायला सुरू केले. पुढे त्याच्यामध्ये मोठी ड्यूटी सुरू झाली मग त्यांनी बॅग करायला सुरुवात केली. चहामध्ये देखील नानांचा होरा असा होता की, येत्या काळामध्ये गांधीवादाचा प्रभाव ओसरेल आणि माणसं चहा जास्त प्यायला लागतील. भविष्यकाळात भारतामध्ये मूलभूत गरज म्हणून चहासाखरेची गरज भासणार म्हणून त्यांनी चहाचा व्यवसाय सुरू केला. पूर्वी ते नुसते चहा विकायचे. नंतर त्यांनी ब्रँडिंग सिस्टिम आणली. ब्रँडिंग सिस्टिम म्हणजे आपला एक ब्रँड बाजारामध्ये रुजला पाहिजे आणि तो चालला पाहिजे. त्यांच्या चहाचा ‘एच. पी. गोल्ड' नावाचा ब्रँड आहे हे ‘एच. पी.' म्हणजे काय आहे?

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/३९