पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांची व्यापाराची आणखी एक शक्कल होती. इथं मी अनेकवेळा पाहिलेलं आहे की त्या काळात ते स्टेशन रोडला बाहेर खुर्चीवर ते बसलेले असायचे. मला मोठी गंमत वाटायची नानांची. ते मला कधीच व्यापार करताना दिसले नाहीत. कायम मला ते बाहेरच्या खुर्चीवर बसलेले दिसायचे. कधी व्यापार करायचे कोणास ठाऊक? पण त्यांचा व्यापार अनौपचारिक पद्धतीनं चाललेला असायचा. दुकानाच्या दिवाणजी, नोकरांवर त्यांचा विश्वास असायचा. पेढीवर त्यांच्या हाताखाली घरातील तरुण पुतणे, नातू मंडळी काम करत असायची. वर्तमानपत्रं, रेडिओद्वारे दरदाम पहात रहायचे. खरेदीला येणाऱ्या गिऱ्हाइकांशी चर्चा करत त्यांना बाजाराचा होरा कळायचा. त्याप्रमाणे त्यांची खरेदी, विक्री होत रहायची. गि-हाइकाशी त्यांचा संवाद आत्मीय, स्वकीयाचा असायचा. घरच्यांची चौकशी करायचे. कोकणची खबरबात, पाऊस, पीक, पाणी सारं प्रेमपूर्ण संवादाच्या साखर पेरणीत होत राहायचं. बिछायती नानांनी कधी बदलू दिल्या नाहीत. गि-हाईक पिढ्यानपिढ्या नानांकडेच माल घेणं पसंत करायचे.
 जपानी लोक व्यापार कसा करतात? जपानच्या व्यापाराची एक कार्यसंस्कृती सांगितली जाते की जपानी लोक एका माणसाकडून दहा रुपये काढत नाहीत, दहा माणसांच्याकडून एक-एक रुपया काढतात. त्यामुळे टर्नओव्हर वाढतो. उत्पादन वाढतं आणि ओव्हर ऑल ग्रॉस इन्कमही वाढत जातो. नानांची पचं वीस-सत्तावीसच्या (१९२५-२७) काळामध्ये व्यापाराचं हे तंत्र सुरू केलं. नानांच्या व्यापाराचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य होतं. आजच्या ग्लोबल मार्केटिंगच्या जमानात त्यांच अनन्यसाधारण महत्त्व आहे. नानांकडे कोकणातले मोठमोठे अडते होलसेल खरेदीसाठी यायचे.

 नाना असे व्यापारी नव्हते की केवळ आपलचं उखळ पांढरं व्हावं. नानांना लाके विचारायचे, ‘साखरेचा दर काय चाललाय? तेजी आहे का मंदी आहे?' नाना सांगायचे की ‘किती घेणार आहेस तू?' तो सांगायचा ‘पाच पोती' असं कर, दर वाढायची शक्यता आहे. तू दोन पोतीच घेऊन जा आणि दर वाढला तर मी तुला फोन करून कळवीन किंवा उद्या ट्रक येणारच आहे. खाली रत्नागिरीमध्ये मी निरोप देतो.' म्हणजे असं नाही की आलेल्या माणसाला फसवायचं आणि जास्तीत जास्त आपण गिळंकृत करायचं. ही गिळंकृत करण्याची वृत्ती नानांच्यामध्ये अजिबात नव्हती. त्यांचं साधं गणित होतं. आपलंही भलं झालं पाहिजे आणि आपण ज्याच्यावर जगतो त्यांचही! रयतेच्या राजाची उदारता नानांच्या मनामध्ये तुम्हाला असलेली दिसेल!!

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/३८