पान:कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (Kolhapurche swatantryottar samajsevak).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याची अशी गंमत झाली की, नाना रत्नागिरीला बोट पकडायला गेले आणि ते धक्क्यावर जाण्यापूर्वीच बोट निघनू गेली होती. नाना तेथून जे परत आले तसा त्यांनी शिकण्याचा नाद सोडून दिला. ते व्यापारामध्ये रमले. माणसाची गाडी चुकली की जीवनाचा सगळा प्रवास कसा बदलून जातो याचं सुंदर उदाहरण म्हणजे नानांचं आयुष्य. व्यापार एके व्यापार' असं ठरवून त्यांनी आपल्या जीवनाची मांडणी केली.

 नानांनी सुरुवातीला संगमेश्वरमध्ये ठोक (होलसेल) व्यापारी म्हणून आपल्या व्यापारी पाठशाळेची सुरुवात केली. त्या काळामध्ये सर्व खरेदी ही जवळच्या जिल्ह्याच्या गावामध्ये व्हायची. रत्नागिरीला सगळे व्यापारी खरेदी करायला यायचे आणि आपापल्या पेठेमध्ये जाऊन-मग संगमेश्वर असेल, देवरूख असेल अशा ठिकाणी-जाऊन माल विकायचे. नानांनी व्यापार करताना असं पाहिलं की याच्यामध्ये ‘पडतर' फार कमी पडते. ‘पडतर' हा व्यापारी शब्द आहे. अलीकडच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर ‘मार्जिन' किंवा 'फायदा. नानांनी व्यापाराचं एक नवीन तत्रं विकसित केलं. नाना हे सतत व्यापारामध्ये संशोधन करणारे गृहस्थ होते. ‘संशोधन' याचा अर्थ असा की आपण कसा व्यापार करायचा? लोक कसे व्यापार करतात? व्यापारी म्हणून नाना गुजराती माणसांच्या सतत सहवासात राहिले. चमडी देगा लेकिन दमडी नहीं देगा' असं जे आपण गुजराती आणि मारवाडी लोकांच्याबद्दल बोलतो ना, त्या लोकांच्या व्यवहारामध्ये नानांनी पाहिलं की ही मंडळी व्यापार कशी करतात? तर ते मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. नंतर जिथे उत्पादन होतं तिथे खरेदी करतात. म्हणनू नानांनी आपली खरेदीची पद्धत बदलून टाकली. चहा घ्यायचा ना कलकत्त्याला घ्यायचा. साखर घ्यायची ना, कराचीला घ्यायची. मसाल्याचे पदार्थ घ्यायचे ना, कोचीनला जाऊन घ्यायचे. तुमच्या असं लक्षात येईल की कोकणात आजही बागवान आंबे खरेदी करतात ते आंबे काही किलो आणि ट्रकाने खरेदी करत नाहीत. ते बागाच खरेदी करतात. डायरेक्ट बागेमध्ये जातात आणि आंब्याच्या झाडाला लागलेलं फळ बघून ते झाडे विकत घेतात. ही जी पद्धत आहे ती नानांनी बरोबर हेरली आणि आपल्या व्यापारामध्ये फार मोठं 'मार्जिन’, ‘पडतर' कशी जास्त होईल असं पाहिलं. नानांच्या व्यापाराचं आणखी एक कौशल्य, वैशिष्ट्य असं होतं की नाना मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करायचे, शिवाय ती कमी दरात खरेदी करायचे.

कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक/३७