एखादी गोष्ट पाठीवर घालून पुढचा प्रवास करायची त्यांची मानसिक तयारी नि:संग ऋषीप्रमाणे खरंच समदर्शी, निरक्षीरविवेकी असायची.
बापू जे ९३ वर्षांचे जीवन जगतले त्यात ‘मन की खुशी नि दिल का राज' अशी स्वच्छंदता होती. त्या स्वच्छंदतेस त्यांनी मान्य केलेले समाज नियमांचे कुंपण होते. समाजातील नियम, नियती, नैतिकता याची त्यांना चाड नि जाण होती. समाजघर सांभाळणारा हा सद्पुरुष जन्मभर सतत दुस-यांसाठी निरअहंकार जळणाच्या निरांजनासारखा. पण निरांजन (परब्रह्म) बनून निर्विकार झिजत राहिला. निरंजन योगी जरा-मरण मुक्त असतो. बापूंनी लौकिक अर्थाने इहलोकीचा निरोप घेतलेला असला तरी त्याचं येथील अलौकिक कार्य समाजमनात सतत घर करून राहील.
बापूंच्या साहाय्य, संस्कार, सद्भावी उपकृत, अनुग्रहित न झालेली संस्था, संघटना, व्यक्ती सापडणे दुर्लभ. जे कोणी त्याच्या संपर्कात आले त्यांना बापूंनी आपलंसं केलं. आपलं असं त्याचं कोणीच नव्हतं. पण ते सवारत असे विसर्जित, विलीन, रममाण व्हायचे की प्रत्येकाला ते आपले वाटायचे. ते ज्या संस्थांत होते तिथे अनौपचारिक, घरगुती ओलावा राहील याची त्यांनी काळजी घेतली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात, साहचर्यात अशी काही जादू होती की माणूस मग तो कितीही अढ्यताखोर असो तो शेळी बनायचा. बापूंच्या या विलक्षण अशा जनव्यवहारी कौशल्यात त्यांची निरिच्छ, नि:संग, निरांजन वृत्तीच कामी यायची. त्यांच्यात असलेल्या क्षमाशीलतेमुळेच ते पूर्णपणे समाजशील होऊ शकले.
बापूंच्या जाण्याने समाजघर पोरकं झालं. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगायला हवा, अशी समाजमनात असलेली धारणा राजाविषयी असलेली भावना-प्रजेत, लोकांत बापूविषयी होती. त्यांच्या जाण्याची खरी जाणीव समाजघरावर होती. त्यांच्या जाण्यानं काही संस्थांवर चिंतेचे सावट असणे स्वाभाविक आहे. बापू असेपर्यंत या संस्था अभेद्य किल्ल्याप्रमाणे अभिमानाने जीवन जगत होत्या. आता त्यांचं काय होणार? असा प्रश्न- यक्ष प्रश्नच बापूंच्या माहात्म्याची साक्ष देतं. जगन्नाथाचारथ, तो चालेलच. पण बापूंच्या निरिच्छ वृत्तीने जी निर्विघ्नता असायची ती असणं कठीण.