बापूंनी जन्मभर दुस-यांचीच तळी उचलली. प्रसंगी त्यांनी स्वकीय, कुटुंबीयांचा रोष पत्करला पण एकदा का जीवनदृष्टी ठरली की मग त्यांनी त्यातून कधीच माघार घेतली नाही.त्यांच्या विश्वस्त मंडळात वालावलकर कुटुंबीय अपवाद होतं हे सांगून कुणाला खरं वाटणार नाही. माझ्यासारखा निधर्मी,निर्जातीय मनुष्य त्यांचा विश्वस्त सचिव होतो यापेक्षा या माणसातील निरांजनाचं निखळपण ते दुसरं कोणतं असणार ?
हा निरिच्छ योगी अजातशत्रू होता.त्याचं रहस्य त्याच्या सहजप्रसन्न व्यक्तिमत्त्वात साठवलेलं होतं.आपली प्रसन्नता, समृद्धी याचा ध्यास घेतलेले,मंतरलेले बापू मी अनुभवले, निरखलेत कित्येकदा. भेटणाऱ्या प्रत्येकास गुरु बालावधूत महाराजांचा फोटो देऊन ‘पाचाचे पन्नास होतील म्हणून आशीर्वाद, शुभेच्छा देणाऱ्या बापूंना स्वत:ला निधर्मी समजणारे ढोंगी, भोंदू भले म्हणोत, त्यांना बापूंच्यातील ‘सर्वेपि सुखिन सन्तुची सदाशयता या जन्मी कळणे केवळ अशक्य! बापूंनी आपलं मृत्युपत्र केलं नाही. ‘दृष्टीआड ते सृष्टीआड' अशी टोकाची निरिच्छता. तत्त्वाचा टेंभा मिरवणाऱ्यांना काय कळणार? बापू तत्त्वाच्या जंजाळात कधीच अडकले नाहीत. या क्षणी माणसास कसा दिलासा मिळेल, त्यासाठी सर्व ते करण्याची ‘डॉक्टरी तत्परता' बापूंनी नित्य जपली नि जोपासली. समाज ‘आयसीयू'मध्ये असताना ‘तत्पर दिलासा देण्यातील बापूंची परहित दक्षता केवळ साधू वृत्तीची निदर्शक असायची. सवारच्या सर्व प्रसंगात सर्वस्व समर्पण करणारा हा साधनसंपन्न सद्गृहस्थ खरा सिद्ध साधक नव्हे तर साध्य साधक होता असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये.
बापू तसे गृहस्थ, विवाहित. पण लौकिक अर्थाने ते घरी कधी रमले नाहीत. त्यांना आपल्या घरापेक्षा मोठ्या घराची-समाजघराची चिंता असायची. आपल्याशी संबंधित एखाद्या संस्थेची अडचण असली की बापू बेचैन असायचे. समाजघराचा गाडा निर्विघ्न चालावा म्हणून हरत-हेचे साहाय्य करत रहायचे. जाहिराती गोळा करणे, वर्गणी जमा करणे, देणग्या मिळवून देणे, सभासद, पदाधिकारी मंडळींतील मतभेद दूर करणे या सर्वांत बापू रमायचे. समाजातही त्यांचा शब्द हा सर्वोच्च असायचा. सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे अंतिम. मग पुढे चर्चा नाही की प्रतिवाद नाही. समाज घरातील त्यांचे वडीलपण असच नि:संग असायचं. एखादी बैठक वादळी होणार म्हणून सर्व सचिंत असायचे. बापू मात्र निश्चिंत. कुणी निवर्तलं की बापूंना दु:ख जरूर व्हायचं पण वृथा शोक करत ते कधी बसायचे नाहीत.